“एफआरपी’प्रश्‍नी स्वाभिमानीचे साखर आयुक्‍तालयात ठिय्या

भैरवनाथ शुगर वर्क्‍स लिमि. कारखान्याचा परवाना तात्पुरता स्थगित

पुणे – गतवर्षीच्या उसाची “एफआरपी’ अर्थात रास्त आणि किफायतशीर किंमत न दिलेल्या कारखान्यांना गाळप परवाना कसा दिला, याचा जाब विचारायला साखर आयुक्तालयामध्ये आलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर तातडीने निर्णय घेत आयुक्‍तालयाने मराठवाड्यातील भैरवनाथ शुगर वर्क्‍स लिमिटेड या साखर कारखान्याचा गाळप परवानाच स्थगित केला.

परांडा तालुक्‍यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर वर्क्‍स लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या कारखान्यांने गतवर्षीची “एफआरपी’ शेतकऱ्यांना दिलेली नसल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला. ही “एफआरपी’ मिळावी यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन ही सुरू केले आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी तसेच गतवर्षीची “एफआरपी’ दिलेली नसताना ही कारखाने सुरू झाले आहेत. याची माहिती घेण्यासाठी राजू शेट्टी साखर आयुक्तालयात आले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर भैरवनाथ कारखान्यांचे काही शेतकरीसुद्धा उपस्थित होते. या कारखान्याने “एफआरपी’ दिलेली नाही, तरी कारखाना कसा सुरू झाला आहे. याबाबत शेट्टी यांनी कारवाईची मागणी केली.

साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी याबाबत “माहिती घेऊन कारवाई करतो,’ असे आश्‍वासन दिले पण काही जणांनी तातडीने कारखान्यांच्या संचालकांना दूरध्वनी लावून आयुक्तांनी जाब विचारावा, अशी मागणी केली. त्यानुसार साखर आयुक्तांनी कारखान्यांचे संचालक व आमदार तानाजी सावंत यांना दूरध्वनी केला व “एफआरपी’बाबत विचारले असता सावंत यांनीसुद्धा आपण “एफआरपी’ दिल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी “माझ्याकडे राजू शेट्टी आले आहेत, त्यांनी तुमच्या कारखान्याविषयी तक्रारी केल्या आहेत,’ असे सांगितल्यावर सावंत यांनी “शेट्टी यांच्याशी मी बोलतो’ असे सांगितले. त्यानंतर शेट्टी आणि सावंत यांच्यात जो संवाद झाला त्यामुळे सगळे वातावरणच बिघडले आणि चर्चा करण्यासाठी आलेल्या शेट्टी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

त्यानंतर मात्र राजू शेट्टी यांनी आयुक्तांच्या केबीनमध्येच आंदोलन करत “खोटे प्रतिज्ञापत्र देऊन गाळप परवाना घेऊन कारखाना सुरू करणाऱ्या भैरवनाथ शुगर वर्क्‍स कारखान्याचा परवाना स्थागित करा,’ अशी मागणी केली. अखेर आयुक्तांनी तातडीने याबाबतचे आदेश काढत “एफआरपी’ न दिल्याच्या तक्रारी आल्याच्या कारणावरुन व खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल भैरवनाथ शुगर वर्क्‍स लिमिटेड या कारखान्याचा परवाना तात्पुरता स्थगित केला.

साखर आयुक्तांनी माझ्याकडे दूरध्वनी दिल्यावर मी त्यांना सांगितले, की माझ्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत, त्यानुसार मी विचारतो आहे. माझ्याकडे “एफआरपी’ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी नावेसुद्धा आहेत. ही नावे त्यांना सांगितली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी कोणाकोणाची माहिती लक्षात ठेवू, मी शिवसेनेचा नेता आहे. मी दहा कारखान्यांचा चेअरमन आहे. “एफआरपी’ दिली, नाही दिली तरी तुमचा काय संबंध? थकीत “एफआरपी’विषयी आम्ही आणि साखर आयुक्त पाहून घेऊ, त्यामुळे मग मी सुद्धा मला जी तक्रार करायची आहे ती करतो असे सांगून दूरध्वनी ठेवला.
– राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)