“एफआरपी’च्या वादात शेतकरीच भरडतोय!

File Photo

– समीर कोडिलकर

पुणे – राज्यात आता गाळप हंगाम जोर धरू लागला आहे. आतापर्यंत 91 साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर गाळप हंगाम लवकरात लवकर संपविण्यावर सर्वच कारखान्यांचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे, मात्र शेतकरी संघटनांनी आक्रमक होत “एफआरपी’ न दिलेल्या कारखान्यांचा गाळप हंगाम थांबविण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षात कमी-जास्त प्रमाणात कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत, पण संघटनेच्या आग्रहामुळे काही कारखान्यांचे परवाने रखडले आहेत. त्यामुळे या कारखान्यांच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांचा ऊस पडून राहत आहे.म्हणजे एकंदरीत पुन्हा एकदा शेतकरी भरडला जाणार, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.

राज्यात 20 ऑक्‍टोबरपासून गळीत हंगाम सुरू झाला आहे, पण प्रत्यक्षात दिवाळीनंतरच आता गळीप हंगामाला वेग आला आहे. त्यातच कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे अनेकांनी कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. “एफआरपी’पेक्षा जास्त रक्कम देणे आम्हांला परवडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर कारखाने बंद होते. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचा ऊस पडून होता. अनेक ठिकाणी ट्रॅक्‍टरसुद्धा अडविण्यात आले. मात्र, आता पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखाने आता सुरू झाले आहेत. पण, मराठवाडा आणि पुणे विभागातील कारखान्यांचा प्रश्‍न अजून सुटलेला नाही.

मराठवाड्यात तर अनेक कारखान्यांनी गतवर्षीची “एफआरपी’ दिली नाही, तरी कारखाने सुरू केले आहेत. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला मोर्चा या भागात वळविला आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्यावर कारवाई करुन गाळप हंगाम स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पैठण येथील कारखान्याबाहेरसुद्धा अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आश्‍वासन जरी कारखाने देत असल, तरी प्रत्यक्षात मात्र तेवढी रक्कम मिळेलच याची खात्री शेतकऱ्यांना राहिलेली नाही.

कारखान्याचा गाळप हंगाम जर बंद ठेवला, तर त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांवर होत आहे. कापलेला ऊस तसाच पडून राहिल्याने त्याचा उतारा कमी मिळत आहे. हाच जर उस तोडल्यातोडल्या कारखान्यात गेला, तर त्याचा उतारा चांगला मिळतो व पैसे चांगले मिळतात. यंदा दुष्काळामुळे उसाला पाणी कमी दिले गेल्याने उतारा कमी झाला आहे. त्यातच उशीर झाला, तर हा उतारा आणखी कमी मिळत आहे, म्हणजे नुकसान हे शेतकऱ्यांचे होत आहे.

राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत 91 साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. पहिल्या टप्प्यात 8.85 टक्के इतका कमी उतारा मिळत आहे. गेल्या हंगामात 101 सहकारी व 87 खासगी कारखान्यांना 9.05 लाख हेक्‍टरवरील 952 लाख टन उसाचे गाळप केले. त्यापासून 107 लाख टन साखर तयार झाली होती. यंदा आतापर्यंत 51 सहकारी व 42 खासगी कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. कारखान्यांच्या म्हणण्यानुसार, कारखान्यांनी शेतकऱ्यांना पेमेंट अदा केलेले आहे. मात्र, त्यात व्याज अदा केलेले नाही. त्यामुळे या पेमेंटला कायदेशीर म्हणावे किंवा कसे याबाबत शासनाकडून चाचपणी केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीत यातील संभ्रम दूर होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)