एफआयआर मध्ये माझ्या नावाचा उल्लेख नाही

दुष्टहेतून माझ्यावर कारवाई – चिदंबरम
नवी दिल्ली – एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणातील कथीत गैरव्यवहारात जो एफआयआर दाखल झाला आहे त्यात माझ्या नावाचा उल्लेखही नाही पण तरीही माझ्या विरोधात सरकार आकसाने कारवाई करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. चिदंबरम आणि त्यांच्या मुलाला कोर्टाने 7 ऑगस्ट पर्यंत अटक करण्यास काल मनाई केली आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हा आरोप केला आहे.

आपल्या विरोधात कोणताही पुरावा नसताना कारवाई केली जात आहे त्या सर्व आरोपांना कोर्टात योग्य तऱ्हेने उत्तरे दिली जातील असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. या प्रकरणात चिदंबरम यांना आकसाने अटक होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन त्यांनी गेल्या 30 मे रोजीच अटकेपासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. त्यात त्यांना 7 ऑगस्ट पर्यंतचा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणातील सर्व कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांनी आणि यंत्रणांनी जमा केली आहेत. त्यामुळे त्यांना माझ्याकडून आणखी काहीही मिळवणे बाकी नाहीं त्यामुळे आपल्या अटकेची गरज नाही असे प्रतिपादन चिदंबरम यांनी कोर्टात केले आहे. त्यावर 7 ऑगस्टनंतरच अंतिम निर्णय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)