एफआयआरच्या अंतरंगात….(कायदाविश्व )

  •  ऍड. असीम सरोदे

आपल्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांविरोधात तक्रार नोंदवण्याचा अधिकार लोकशाहीमधील महत्त्वाचा अधिकार आहे. एफआयआर म्हणजे काय आणि तो कसा नोंदवावा याची प्राथमिक माहिती सर्वच नागरिकांना असणे आवश्‍यक आहे.

अनेकदा काही तरी गुन्हा घडतो किंवा आपल्याला लोकांकडून त्रास दिला जातो अशा वेळी पोलिसांची मदत घेणे नेहमीच आवश्‍यक ठरते. त्यासाठी पोलिसांकडे तक्रार नोंदवावी लागते. ही तक्रार दखलपात्र गुन्ह्यासंदर्भात असेल तर पोलीस ती तक्रार नोंदवून घेतात. त्याला एफआयआर (फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट) म्हणजेच प्राथमिक माहिती अहवाल म्हणतात. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 154 नुसार पोलीस एफआयआर नोंदवून घेत असतात. एफआयआर दाखल करणे ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढील सर्व कायदेशीर प्रक्रियेमध्ये एफआयआर अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. दखलपात्र गुन्ह्यासंदर्भात माहिती असणारी कोणीही व्यक्‍ती पोलिसांकडे जाऊन एफआयआर दाखल करू शकते. अन्यायग्रस्त व्यक्‍ती स्वतः किंवा त्यांच्या वतीने कोणीही पोलिसांकडे जाऊन दखलपात्र गुन्ह्याची माहिती देतात आणि त्याची नोंद होते तेव्हा त्याला एफआयआर नोंदवला गेला असे आपण म्हणतो.

तुमच्याविरुद्ध एखादा गुन्हा झाला असेल तर तुम्ही एफआयआर दाखल करू शकता. त्याचबरोबर सामाजिक दृष्टिकोनातून विघातक स्वरूपाचा असणाऱ्या गुन्ह्याबाबत तुम्हाला जर माहिती असेल किंवा गुन्हा घडणार असेल तर त्याबाबत तुम्ही एफआयआर नोंदवू शकता. तुम्ही स्वतः एखादा गुन्हा घडताना पाहिला असेल किंवा तुमच्यासमोर गुन्हेगारी स्वरूपाचे एखादे कृत्य घडले असेल तर त्यासंदर्भात एफआयआर दाखल करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. आपल्याला गुन्ह्यासंदर्भात असणारी माहिती तोंडी स्वरूपात दिल्यानंतर ती माहिती लिहून घेऊन पोलीस आपल्याला ती वाचून दाखवतात. आपण दिलेली माहिती योग्य आहे की नाही, याची शहानिशा करून घेणे आवश्‍यक असते. ही शहानिशा केल्यानंतरच आणि लिखित माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच त्यावर सही करावी. जे लोक लिहू शकत नाहीत त्यांनी आपल्या डाव्या हाताचा अंगठा त्या अहवालावर उमटवणे आवश्‍यक असते. लिहिता-वाचता येत नसेल तर एखाद्या व्यक्‍तीची मदत घेऊन दिलेली माहिती एफआयआरमध्ये योग्य प्रकारे नोंदवली गेली आहे की नाही, याची शहानिशा करण्याचा अधिकार आहे. पोलिसांकडून एफआयआरची प्रत मोफत मिळणे, हा प्रत्येक तक्रार देणाऱ्याचा अधिकार आहे.

एफआयआरमध्ये आपले पूर्ण नाव, पत्ता, तक्रार देत असलेल्या दिवसाची तारीख, वेळ, कोणत्या संदर्भात आपण तक्रार देत आहोत त्या स्थळाची माहिती, पत्ता आणि इतर सर्व सत्य वस्तुस्थिती पोलिसांना सांगणे आवश्‍यक आहे. ज्या व्यक्‍तीविरुद्ध आपली तक्रार आहे त्या व्यक्‍तीचे नाव किंवा पत्ता माहीत नसल्यास त्याचे योग्य वर्णन, त्या व्यक्‍तीचा पोषाख आदी माहिती, घडलेल्या घटनेचा तपशील पोलिसांना दिला पाहिजे. एफआयआर दाखल करून घेणे हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे. त्यास नकार देणे हे बेकायदेशीर आहे. घडलेल्या गुन्ह्याचे काही साक्षीदार असतील तर त्यांचीही माहिती पोलिसांना

एफआयआर नोंदवताना दिली पाहिजे. एफआयआर देताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याचीही माहिती आपल्याला असणे आवश्‍यक आहे. तक्रार देताना कधीही चुकीची माहिती देऊ नका. अशा प्रकारे खोटी तक्रार केली अथवा खोटा एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी भादंवि 203 नुसार गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. एफआयआर नोंदवताना वस्तुस्थिती जशी आहे तशीच सांगितली पाहिजे. सर्व गोष्टी योग्य पद्धतीने स्पष्ट केल्या पाहिजेत. तक्रार नोंदवताना कधीही अवास्तव, अतिशयोक्‍तीपूर्ण, असंबंद्ध वक्‍तव्ये नमूद करू नका. एफआयआर रजिस्टर करण्यास पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास पोलीस आयुक्‍तांकडे जाऊन आपण तक्रार नोंदवू शकतो. पोलिसांनी नकार दिल्यास आपण लेखी तक्रार रजिस्टर पोस्टने त्या पोलीस ठाण्याकडे पाठवू शकतो. तसेच एफआयआर दाखल करून न घेतल्यास खासगी तक्रार थेट न्यायाधिशांकडे करण्याचा अधिकारही नागरिकांना असतो. पोलिसांच्या अशा एफआयआर दाखल करून न घेण्याच्या बेकायदेशीर वागणुकीविरुद्ध मानवी हक्‍क आयोगाकडे तक्रार करण्याचा अधिकारही नागरिकांना आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांमध्ये एफआयआर दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असेल अथवा नकार दिला जात असेल तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया करावी असे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे गुन्ह्याची तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया भारत, बांगलादेश, पाकिस्तान या देशांमध्ये आहे. तसेच दखलपात्र गुन्ह्यांसाठी पोलिस ठाण्यांमध्ये वेगळे रजिस्टर असते आणि त्यामध्येही याची वेगळी नोंद केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)