एप्रिल फूल चा फंडा !

एप्रिल फूल म्हटलं की आपोआपच मनात गुदगुल्या होऊ लागतात आणि आपण सकाळपासूनच मोठ्या आवेशाने मूर्ख (फूल) बनविण्यासाठी एखादा बकरा शोधू लागतो. बकरा शोधण्याच्या आणि त्याला एप्रिल फूल बनविण्याच्या नादात आपलाच एप्रिल फूल कधी होऊन जातो, हे आपल्यालाही कळत नाही.
मुळात एप्रिल फूल ही संकल्पना लहानपणी ऐकलेल्या “लांडगा आला रे आला’ गोष्टीसारखी वाटते. त्या गोष्टीतील मेंढपाळ दररोज गावकऱ्यांचा एप्रिल फूल करण्यासाठी ‘लांडगा आला रे आला’ अशी आरोळी देत असतो. आणि त्याची आर्त हाक ऐकून गावकरीही हातातली सर्व कामे टाकून धावून येत असतात. परंतु एके दिवशी खरोखरच लांडगा येतो आणि कोणीही धावून न आल्यामुळे त्याची काय फजिती होते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.
आता यातून बोध घ्यायचा, किंवा वर्षातून एकदा लोकांना मूर्ख बनविण्यात गैर ते काय म्हणायचे, हे आपल्या प्रत्येकालाच ठरवायचे आहे.
काल एका सामाजिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. अनेक मान्यवर त्या व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील लोक आपले मनोगत व्यक्त करत होते आणि लोकही प्रत्येक वक्‍त्याला टाळ्यांनी यथायोग्य दादही देत होते. अचानक त्या भागातील राजकीय पुढारी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह तेथे हजर झाले. त्यांचा सत्कार वगैरे उरकला आणि त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली. त्यांनी नेहमीच्या शैलीत कार्यक्रमाचा मूळ मुद्दा सोडून आपण केलेल्या कामांचा पाढा वाचायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भरमसाठ अशा आश्‍वासनांची खैरात करायला सुरुवात केली. सर्वजण शांततेने ऐकत होते. भाषण शेवटाकडे चालले होते आणि त्यांची आश्‍वासने संपत नाहीच तोवर गर्दीतून एका गृहस्थाने दबक्‍या आवाजात “एप्रिल फूल’ का? असे म्हटले आणि काही सेकंदातच कार्यक्रमाच्या त्या गर्दीत एकच हशा पिकला. त्याने तें पुढारी मात्र पुरतेच भांबावले आणि घाम पुसत आपले भाषण आटोपून व्यासपीठावर आपल्या जागी जाऊन बसले. हा किस्सा विनोदासाठी नक्कीच चांगला आहे. परंतु यातून डोकावणारी वास्तविकताही आपल्या लक्षात यायला हवी.
काल मलाही या एप्रिल फूलचा चांगलाच अनुभव आला. अनेक मित्रांनी मला पद्धतशीर एप्रिल फूलही केले. त्याचवेळी माझ्या मनात विचार आला की एप्रिल फूल बनविण्यासाठी विशिष्ट अशा एकाच दिवसाची काय गरज आहे? कारण समाजात आपल्या स्वार्थासाठी आणि कार्यभागासाठी अनेकजण बाराही महिने लोकांना एप्रिल फूल बनवत असतातच की !
मुळात प्रामाणिकता आणि विश्‍वासार्हता आज मोठ्या प्रमाणात लयास जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. विविध प्रलोभने,आश्‍वासने आणि आमिषे दाखवून लुटण्याचे धंदे आज ऑनलाईन आणि ऑफलाईनही चालू आहेत. आपण एप्रिल फूलचे औचित्य साधून लोकांना मूर्ख बनविण्याची संधी शोधत असतो, परंतु आपण स्वतः वर्षभर एप्रिल फूल ठरत असतो. या स्मार्टफोनच्या जमान्यात आपणही स्मार्ट होण्याची आज नितान्त गरज आहे. कोणावरही विश्‍वास ठेवण्यापूर्वी सूज्ञता आणि गुणग्राहकता आपल्याला आपल्या अंगी बाणवायला हवी.
एप्रिल फूल बनवायचेच असेल, तर आपणच आपल्यातील वाईट प्रवृत्तींना एप्रिल फूल करायला शिकले पाहिजे. दररोज उशिरा उठण्याच्या सवयीला अचानक पहाटे उठून, व्यायाम करून आपल्या अंगातील आळसाला एप्रिल फूल केले पाहिजे. स्वतःला नेहमीच अज्ञानी समजणाऱ्या आपल्या मनाला वाचनाची सवय लावून अज्ञानाला एप्रिल फूल केले पाहिजे. सर्वांशी जिव्हाळ्याने वागून आपल्यातील अहंकाराला एप्रिल फूल केले पाहिजे. गरजवंतांना मदतीचा हात देऊन आपल्यातील स्वार्थाला एप्रिल फूल केले पाहिजे. अशा अनेक अयोग्य गोष्टी आहेत, ज्यांना एप्रिल फूल करून आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार ठरू शकतो. चला तर आता एप्रिल फूल चा फंडा जरा वेगळ्या पद्धतीने अजमावून थोडेसे होपफ़ुल आणि कलरफुल व्यक्तिमत्त्व घडवूया.

 

सागर ननावरे-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)