एनबीएफसीना रिऍल्टीला कर्ज पुरवठ्याची संधी

 एनपीएमुळे व घोटाळ्यांमुळे बॅंकांनी कर्ज पुरवठ्यात घेतला आखडता हात

नवी दिल्ली – बॅंकांचे वाढलेले एनपीए तसेच पीएनबीमधील घोटाळा या कारणामुळे बॅंका आता कर्ज वितरणावेळी अधिक सावध झाल्या आहेत. त्यामुळे बॅंकांकडून रिऍल्टी क्षेत्राला होणाऱ्या कर्ज पुरवठ्यावर परिणाम होत आहे. मात्र बिगर बॅंकिंग वित्त संस्था म्हणजे एनबीएफसीना रिऍल्टी क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याची संधी निर्माण झाली आहे. बॅंका आता ताक फुंकुन पिण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे जास्त जोखमीच्या समजल्या जाणाऱ्या रिऍल्टी क्षेत्राला कर्ज देताना बॅंका आता अधिक चौकस होऊ लागल्या आहेत. विकसकाकडून अधिक कागदपत्राची आणि पुरेशा तारणाची मागणी केली जाऊ लागली आहे.

बॅंकांच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, अगोदरच बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता वाढल्यामुळे वातावरणात तणाव आहे. बॅंका आता जास्त जोखीम घेण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे विकसकांना विशेषत: व्यावसायिक प्रकल्पाच्या विकसकांना कर्ज मिळणे पुर्वीच्या तुलनेत अवघड जात आहे. नीरव मोदी प्रकरणानंतर इतर बॅंकांच्या कामकाजावरही परिणाम होत आहे. कर्मचारी प्रत्येक नियम काटेकोरपणे तपासण्याची काळजी घेत आहेत. रिझर्व्ह बॅंकेने तूर्त तरी लेटर ऑफ अंडरटेकिंगवर बंदी घातली आहे. ज्या कंपन्यानी कर्जाची परतफेड केलेली नाही त्या कंपन्याच्या प्रवर्तकांना जबाबदार धरून त्यांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे सावध वातावरण आहे.

विकसकांना खेळत्या भांडवलासाठी बॅंकाकडून कर्ज घेता येते. त्याचे व्याजदरही कमी असतात. खेळत्या भांडवलातून तातडीची कामे केली जात असतात. त्यामुळे विकसकांना ते लवकर हवे असते. मात्र आता बॅंका नवे कर्ज मंजूर करतांना जास्त वेळ घेत आहेत. त्याचबरोबर जुन्या मंजूर कर्जाचीही फेरतपासणी करीत आहेत, असे काही विकसकांनी सांगितले.
बॅंकांची जोखीम घेण्याची क्षमता कमी झाली आहे. थोडीशी शंका आली तरी बॅंका कर्जाची प्रक्रिया थांबवित आहेत. त्यातल्या त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका जास्तच सावध राहून काम करीत असल्याचे वातावरण आहे. विविध क्षेत्रातील कंपन्याना कर्ज देतानाही बॅंका तपशिलात चौकशी करीत आहेत.

या घडामोडीचा रिऍल्टी क्षेत्राबरोबरच दागिने, ऊर्जा, दूरसंचार क्षेत्रांवरही परिणाम झाला आहे. आता दागिने उत्पादकांना बॅंका पूर्वीइतक्‍या सढळ हाताने कर्ज देतांना दिसत नाहीत. त्याचबरोबर मोबाइल कंपन्यानाही कर्ज मिळणे अवघड झाले आहे. या कंपन्यांवर अगोदरच मोठे कर्ज आहे. त्यामुळे आता बॅंका त्या कर्जाच्या वसूलीबाबत जास्त काळजी करीत असल्याचे वातावरण आहे.

आता बॅंकांना रियल इस्टेट क्षेत्राकडून 1.1 लाख कोटी रुपयाचे येणे आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या रकमेत 1.1 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे. बॅंकांनी रिऍल्टीला कर्ज पुरवठा कमी केला असल्यामुळे एनबीएफसीसाठी चांगली संधी निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. आता विकसक आमच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात चौकशी करीत आहेत असे काही एनबीएफसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बऱ्याच कंपन्यांकडून वित्त पुरवठा कमी होत असल्याबद्दल तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कंपन्याची विस्तारीकरणाची कामे अडकली आहेत. मात्र, बॅंकाचे काही बडे अधिकारी सांगतात की, असे वातावरण फार काळ राहणार नाही. बॅंकाना काही काळ सावध राहवे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)