एनबीएफसींना पुरेसे भांडवल मिळणार 

शेअरबाजारात आशावाद परतल्याने निर्देशांक उसळले 
मुंबई: भांडवल सुलभतेच्या अभावामुळे बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) अडचणीत आल्या होत्या. त्यांची 45 हजार कोटी रुपयांची मालमत्ता विकत घेऊन स्टेट बॅंकेने त्यांना भांडवल सुलभता उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर भांडवल असुलभतेची गंभीर दखल घेऊन रिझर्व्ह बॅंकेने या आठवड्यात 12 हजार कोटी रुपयांचे रोखे खरेदी करण्याचा निर्णय घतला आहे. देशांतर्गत प्रश्‍न सोडविण्यासाठी या दोन घटना तूर्तास तरी पुरेशा आहेत. त्याचबरोबर क्रुडच्या दरवाढीला काही प्रमाणात सकाळी लगाम बसल्यानंतर डॉलरची मागणी कमी होऊन रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाली. या कारणामुळे शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात निवडक खरेदी होऊन निर्देशांक चांगलेच उंचावले.
बाजार बंद होताना बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 461 अंकांनी वाढून 34760 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 159 अंकांनी म्हणजे 1.54 टक्‍क्‍यांनी वाढून 10460 अंकांवर बंद झाला. गेल्या काही दिवसात झालेल्या मोठ्या विक्रीमुळे अनेक कंपन्यांचे शेअर आता तुलनेने कमी भावावर उपलब्ध आहेत. आज वाहन, धातू आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. काल सेन्सेक्‍स 175 अंकांनी कमी झाला होता. मात्र, आज बाजारात सकाळपासून सकारात्मक वातावरण होते. त्यामुळे निर्देशांक दिवसभर वाढत गेले.
आयएल ऍण्ड एफएस कंपनीला काही देणी चुकती करता आली नाहीत. त्यामुळे बिगर बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांना भांडवल सुलभतेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होते. तसे काही झाले नसल्याचे स्टेट बॅंकेने आणि इतर सरकारी बॅंकांनी सांगितले होते. मात्र, तरीही या कंपन्यांचे शेअर कोसळत होते. मात्र, आता स्टेट बॅंकेने प्रत्यक्ष 45 हजार कोटी रुपये त्यासाठी उपलब्ध केले आहेत. त्यामुळे शेअरबाजारात एकूणच सकारात्मक वातावरण तयार झाले होते.
गेल्या अनेक आठवड्यांपासून रुपयाचे मूल्य एकतर्फी कमी होत आहे. त्यामुळे परदेशातील गुंतवणूकदारांना भारतातील गुंतवणूक फारशी आकर्षक राहिलेली नाही. त्याचा परिणाम निर्देशांकांवर होत होता. आज सकाळी रुपयाचा भाव 34 पैशानी वाढल्यानंतर गुंतवणूकदारांच्या मनातील ती शंका कमी झाली. त्यामुळेही शेअरबाजारातील वातावरण सकारात्मक झाल्याचे दिसून आले.
काल डॉलरचा दर कमी झाल्यानंतर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी झाला. जर हीच परिस्थिती कायम राहीली तर शेअरबाजारात काही काळ स्थिरता कायम राहू शकते. असे ब्रोकर्सनी सांगितले. मात्र, वाढत असलेल्या क्रुडचा धोका अजूनही कमी झालेला नाही. या आठवड्यापासून कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर होणे सुरू होणार आहे. आता गुंतवणूकदारांचे त्या घटनाक्रमाकडे लक्ष राहणार आहे. जर कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले तर निर्देशांकांना आधार मिळणार असल्याचे दिसून येईल. मोठ्या कंपन्यांबरोबरच आता बिगर बॅंकिंग वित्त कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्याचे दिसून आले. बंधन बॅंकेने चांगला नफा झाल्याचा ताळेबंद जाहीर केल्यानंतर या बॅंकेचा शेअर आज उसळला.
विमानाच्या इंधनाचे दर जास्त असल्यामुळे विमान वाहतूक कंपन्या आतापर्यंत पिछाडीवर होत्या. आता सरकार विमानाच्या इंधनावरील उत्पादन शुल्कात काही प्रमाणात कपात करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही आज वाढ झाल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)