खासदार सुळे यांचा इशारा
उत्तमनगरमध्ये एनडीएविरोधात निदर्शने
उत्तमनगर – ग्रामस्थांची सहकार्याची भूमिका आहे. परंतू एनडीए अधिकारी मनमानी कारभार करत नागरिकांची पिळवणूक करत आहेत. एनडीए हद्दीतील गावांसाठी पीएमपीएल बस सेवा, रस्ता व मंदिरासंदर्भातील आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास दि.30 मे रोजी एनडीएत होणाऱ्या परेडला उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला जाईल. परंतू ती वेळ एनडीएने आमच्यावर येऊ देऊ नये, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
एनडीए हद्दीतील धनगरबाबाच्या यात्रेदरम्यान भाविकांना एनडीए अधिकाऱ्यांकडून मिळालेली वागणूक, अहिरे गाव व इतर वाड्यांवरील ग्रामस्थांना प्रवेशासंदर्भात व ग्रामदैवतांच्या पुजेअर्चेबाबत होत असलेल्या त्रासाविरोधात बुधवारी सुळे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा उत्कर्ष स्वयंसहाय्यता बचत गट संघ, शिवणे, उत्तमगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे व अहिरेगाव नागरी कृती समितीच्या वतीने कोंढवा गेटजवळ जनआंदोलन छेडण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी उत्तमनगरचे माजी सरपंच सुरेश गुजर, शुक्राचार्य वांजळे, जालिंधर कामठे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, देशाच्या सुरक्षतेसाठी एनडीए अतिशय मोलाचे कार्य करते. अशी संस्था आमच्या भागात आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या अगोदरच्या काळात एनडीएच्याविरोधात आंदोलन करण्याची कधी वेळ आली नव्हती. सुरक्षेचा विषय आम्हाला कळतो. पण विनाकारण नागरिकांना दिला जाणारा त्रास बंद झाला पाहिजे. एनडीएचे अधिकारी व गावांमधील सरपंच यांची पूर्वी होती तशी कमिटी स्थापन करण्यात यावी. या कमिटीची महिन्यातून एकदा बैठक झाल्यास असे प्रश्न निर्माणच होणार नाहीत.
पीएमपी बस मोकरवाडीपर्यंत सुरू करावी, प्रवासी रस्ता ग्रामस्थांसाठी खुला करावा, पूजाआर्चेची बंदी उठवावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. गुजर म्हणाले की, एनडीएकडून ग्रामस्थांना कधीच त्रास दिला जात नव्हता. अधिकारी व ग्रामस्थ जिव्हाळ्याचे संबंध होते. पण मग आताच नेमका त्रास देणे का सुरू झाले आहे, हे कळत नाही. एनडीएच्या चुकीच्या धोरणांमुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा