एनडीएत सहभागी होण्यासाठी शहांचे नितीश यांना निमंत्रण

नवी दिल्ली -भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) जेडीयूचा सहभाग ही आता केवळ औपचारिकातच बनली आहे. अशातच जेडीयूला एनडीएत सहभागी होण्याचे निमंत्रण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्या पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिले आहे.

स्वत: शहा यांनीच ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. नितीश आणि माझी शुक्रवारी येथे भेट झाली. या भेटीत मी एनडीएत सहभागी होण्याचा प्रस्ताव जेडीयूला दिला, असे त्यांनी म्हटले. बिहारमधील राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रीय राजकारणातील समीकरणे बदलली आहेत. राजद आणि कॉंग्रेसचा समावेश असलेल्या महाआघाडीबरोबरचे संबंध तोडून जेडीयूने त्या राज्यात भाजपशी युती करून सरकार स्थापन केले. त्या घडामोडीनंतर जेडीयूचा एनडीएमधील प्रवेश निश्‍चित मानला जात आहे.

याबाबतचा औपचारिक निर्णय 19 ऑगस्टला पाटण्यात होणाऱ्या जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत घेतला जाण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर जेडीयूला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्‍यता आहे. जेडीयूच्या समावेशामुळे एनडीएची राष्ट्रीय स्तरावरील ताकद आणखी वाढणार आहे. तर भाजपशी राजकीय संघर्ष करण्याच्या उद्देशातून एकजूटीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या विरोधी पक्षांच्या दृष्टीने जेडीयूचे पाऊल हादरा मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)