250 सोसायट्यांना जिल्हा प्रशासनाची नोटीस
पुणे – जमिनीचा अकृषिक कर (एनए टॅक्स) चुकविल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने शहरातील सुमारे अडीचशेहून अधिक सोसायट्यांना थकबाकीच्या नोटीस पाठविल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी असल्याने काही सोसायट्यांना लाखो रुपयांचा दंडासह या नोटीस आल्या आहेत. ही थकबाकी भरली नाही, तर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शेत जमिनींचे रूपांतर अकृषिक जमिनीमध्ये करून शहरात अनेक गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्यांची संख्या शहरात मोठी आहे. या सोसायट्यांना दरवर्षी अकृषिक कर जिल्हा प्रशासनाकडे भरणे बंधनकारक आहे. त्याचा दरही अडीच ते तीन रुपये प्रति चौरस मीटर आहे. परंतु अनेक सोसायट्यांनी हा कर वेळेवर भरला नाही. तर अशा स्वरूपाचा कर भरावा लागतो, याची कल्पना देखील काही सोसायटीधारकांना नाही. त्यामुळे बहुतांश सोसायट्यांनी हा कर थकविला आहे. काही सोसायट्यांचा तर गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासूनची या कराची थकबाकी आहे.
दरवर्षी हा कर भरला नाही, तर त्याच्या थकबाकीवर दर महिना दोन टक्के व्याज लागते. त्यामुळे काही सोसायट्यांची ही थकबाकीची रक्कम दंडासह 15 ते 16 लाखांवर गेली आहे. अशी सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक थकबाकी पुणे शहरातील सोसायट्यांकडे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांची वसुली करण्यासाठी सोसायट्यांना नोटीस बजाविण्यास सुरूवात केली आहे. जर ही रक्कम भरली नाही, तर दंडात्मक कारवाई बरोबरच जप्तीपर्यंतची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून होऊ शकते.
नागरिकांनो, कारवाई टाळावी
शेत जमिनीचे रूपांतर बिगरशेती करून घेतलेल्या जमिनींवर ज्या सोसायट्या उभा आहेत, त्यांना दरवर्षी अकृषिक कर भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या सोसायट्यांकडे या संदर्भातील थकबाकी आहे, त्यांना नोटीस पाठविल्या आहेत. सोसायट्यांनी तो कर त्वरित भरावा आणि कारवाई टाळावी. तसेच दरवर्षी नियमित कर भरल्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा