‘एनएसजी’ आणि मसूद प्रकरणी चीन पुन्हा भारताला अडवणार

नवी दिल्ली, दि. 20 : “एनएसजी’मधील प्रवेश आणि जैश ए मोहंम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या अझहर मसूद याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यापुढेही विरोध केला जाईल, असे चीनने म्हटले आहे.
आण्विक पुरवठादार गट अर्थात “एनएसजी’मधील भारताच्या प्रवेशाला चीनने गेल्यावर्षी विरोध केला होता. तसेच अझहर मसूदला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीमध्ये टाकण्याच्या भारताच्या प्रस्तावालाही विरोध केला होता. पाकिस्तानमध्ये रहात असलेल्या अझहर मसूदवर संयुक्‍त राष्ट्राकडून ही बंदी घातली गेली तर त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आणि मालमत्ता गोठवली जाणार होती. हे दोन्ही विषय भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत. पूर्वीपासून मित्र असलेल्या पाकिस्तानला गोंजारण्यासाठीच चीनने या दोन विषयांच्याबाबतीत भारताची कोंडी केली आहे.
भारताने अण्वस्त्र स्पर्धा रोखण्यासाठीच्या अण्वस्त्रप्रसार बंदी करार अर्थात “एनपीटी’वर स्वाक्षरी केलेली नाही, असे कारण देऊन चीनने “एनएसजी’मधील भारताच्या प्रवेशाला विरोध केला होता. जर भारताला सदस्यत्व दिले गेले, तर पाकिस्तानलाही हा नियम लागू व्हायला हवा, असे चीनचे म्हणणे आहे. तर अझहर मसूदवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाविरोधात चीनने नकाराधिकार वापरला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)