“एनएसएस’सारख्या कॅम्पला जाताना घ्यावयाची काळजी…

कॉलेज सुरू झाले की “एनएसएस’सारखे कॅम्प खूप महत्त्वाचे ठरतात. या ठिकाणी जाण्यास आपण खूप उत्सुक असतो; पण ही ट्रीप नसते, तर तिथे जाऊन आपल्याला काही काम करायचे असते. त्यात हे कॅम्प आदिवासी क्षेत्रात असतील तर आपल्या अनेक प्रकारची वेगळी काम करायला लागतात, अशा वेळी आपण काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


– कॅम्पला जाताना तिथले लोकेशन कोणते आणि कसे आहे, याचा आधी अभ्यास करावा.
– तिथल्या लोकांच्या सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक गरजांचा विचार करून त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे काम करायचे ते लक्षात घ्यावे.

– ग्राम स्वच्छता अभियानासारखे अभियान राबवायचे असेल तर तसे फलक तयार करणे, ग्रामस्थांना अपल्यात सहभागी करून घेण्यासाठी पथनाट्यासारख्या गोष्टींची तयार करणे, महत्त्वाचे ठरते. कचरा निर्मूलनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे आणि त्याची सवित्सर माहिती प्रात्यक्षिकांसह देणे या गोष्टी देखील केल्या तर तिथल्या लोकांपर्यंत ते अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचते.

– आरोग्याचा प्रश्‍न, स्वच्छ पाण्याचा प्रश्‍न, योग्य आणि पोषक आहाराबाबतची शिकवण, माता-बाल संगोपन, आरोग्य केंद्रांची माहिती, तिथल्या शाळांची स्थिती अषाधी आपण समजून घेऊन मग ही शिबिरे केली तर त्याचा चांगला फायदा ग्रामीण भागात होणार आहे.

– ग्रामीण भागात सगळ्यात मोठा प्रश्‍न हा तेथील रस्त्यांचा, सांडपाण्याचा, स्वच्छतागृहांचा आणि पर्यायाने आरोग्याचा असतो. त्यासाठी तिथल्या लोकांमध्ये मिसळणे आवश्‍यक असते.

– त्या भागातील तरुणांना एकत्र करून, त्यांच्या सहभागाने शिबिर यशस्वी करता येते.

– आदिवासी भागात जाताना तिथल्या लोकांसाठी शहरात मिळणाऱ्या वेगवेगळे पदार्थ म्हणजे बेकरी प्रॉडक्‍ट्‌स, कॅडबरीज्‌ असे नेण्यापेक्षा त्यांच्याच भागात मिळणाऱ्या फळ-भाजीपाल्यांचा योग्य आणि सकस वापर कसा करयाचा, हे त्यांना तिथे जाऊन प्रात्यक्षिकांसह दाखवले तर उपलब्ध साधन-साहित्यातच त्यांना त्यांची जीवनशैली सुधारण्यास मदत होईल.

– आपले जुने कपडे, चादरी, ब्लॅकेट्‌स, शालोपयोगी साहित्य, साबण, छत्र्या किंवा रेनकोट अशा गोष्टी आदिवासी भागातील मुलांसाठी नेल्या तर खरोखरच त्यांना त्याचा उपयोग होतो.

– आपल्या कार्यक्रमांत त्यांना सहभागी करून घेताना त्यांच्या संस्कृतीचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. काही लोकगीते, लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती हे देखील अभ्यासण्यासारखे असते. त्यांच्यातील कलागुणांचा त्यांच्याच उन्नतीसाठी कसा वापर करता येईल, हेही पाहता येईल.

– आपल्याबरोबर क्रोसिन, अडुळसा, त्रिभुवनकीर्ती, बोरोलिन किंवा कैलास जीवन यांसारखी औषधे बरोबर ठेवावीत. जी तिथल्या लोकांसाठी आणि काही वेळ आली तर आपल्यासाठीही उपयोगी पडतील.
या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपला कॅम्प यशस्वी तर होईल, पण ग्रामीण, दुर्गम भागातील हे लोक या कॅम्पमध्ये सहभागी होऊन आपला कॅम्पचा उद्देश सफल होण्यास त्याचा उपयोग होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)