“एनएसएस’च्या विशेष शिबिरांचे होणार मूल्यमापन

विकासात्मक कामे केली नसल्यास निधी रोखणार


महाविद्यालयांच्या कामांचे विद्यापीठ मूल्यमापन करणार

– डॉ. राजू गुरव

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील वरिष्ठ महाविद्यालयांची राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागांतर्गत दत्तक गावांमध्ये विशेष निवासी शिबिरे राबविली जातात. आता या 7 दिवसांच्या शिबिरांच्या कालावधीत महाविद्यालयांनी केलेल्या कामाचे विद्यापीठाकडून कसून मूल्यमापन करण्यात येणार आहे. विकासात्मक कामे न करणाऱ्या महाविद्यालयांचा निधीच रोखण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“एनएसएस’ विभागाच्या माध्यमातून दरवर्षी महाविद्यालयीन स्तरावर नियमित कार्यक्रम व विशेष निवासी शिबिर असे दोन टप्प्यात कार्यक्रम राबविण्यात येतात. प्रत्येक वर्षी एका महाविद्यालयाकडून एक गाव दत्तक घेतले जात होते. चालू शैक्षणिक वर्षापासून त्यात बदल करण्यात आले असून 3 महाविद्यालयांनी एकत्र येऊन एक गाव दत्तक घेण्याची नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. 3 वर्षांसाठी महाविद्यालयांनी गावे दत्तक घेण्याचे बंधनही विद्यापीठाकडून घालण्यात आले. मात्र, काही महाविद्यालयांकडून या नियमावलींचे पालनच केले नसल्याचे आढळून आले आहे. काही महाविद्यालयांनी एकत्रित शिबिरे घेण्याऐवजी स्वंतत्रपणेच शिबिरे घेण्याचा पर्याय निवडला आहे.

सद्यस्थितीला एकूण 481 महाविद्यालयांमध्ये एनएसएसचे विभाग सुरू आहेत. यात पुणे शहरातील 180, पुणे ग्रामीणमधील 123, अहमदनगरमधील 95, नाशिकमधील 122 महाविद्यालयांचा समावेश आहे. नियमित कार्यक्रमांसाठी एकूण 57 हजार, 600 विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात येत असते. तर, विशेष निवासी शिबिरात 28 हजार, 800 विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यासाठी केंद्र शासनाकडून महाविद्यालयांना निधीही वाटप करण्यात येत असतो. यातील 10 हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठ फंडातूनच निधी देण्यात येत असतो.

महाविद्यालयांनी प्रामुख्याने डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यातच विशेष शिबिरांचे आयोजन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आतापर्यंत 70 टक्‍के महाविद्यालयांनी शिबिरांचे कार्यक्रम पूर्ण केले आहेत. उर्वरित 30 टक्‍के महाविद्यालयांनी जानेवारी अखेरपर्यंत शिबिरांचे कार्यक्रम पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे. 40 टक्‍के महाविद्यालयांनी शिबिरासाठी आधी निश्‍चित केलेली गावे सुविधांच्या अभावामुळे बदलली असल्याचे उघडकीस आले आहे. गावांचा नव्याने शोध घ्यावा लागल्यामुळे अनेक महाविद्यालयांना शिबिरांच्या तारखाही बदलाव्या लागल्या आहेत.

या वर्षी कामांचा दिखावा करून निधी लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविद्यालयांना चाप बसविण्यासाठी विद्यापीठाकडून कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. विशेष पथकांमार्फत शिबिरांना भेटी देण्याचे सत्र सुरूच ठेवण्यात आले आहे. यामुळे बहुसंख्य महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहेत. महाविद्यालयांना विशेष शिबिरांचा सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी फेब्रुवारीअखेर पर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये कार्यक्रम अहवाल व लेखा परीक्षण अहवालांच्या तपासणीची कामे मार्गी लावण्यात येणार आहे. याच वेळी महाविद्यालयांना निधीचे धनादेशही वाटप करण्याचे नियोजन विद्यापीठाने केलेले आहे, अशी माहिती विद्यापीठातून मिळाली आहे.

विशेष पथकांमार्फत कामांची तपासणी
महाविद्यालयांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची कामे प्रामाणिकपणे राबविणे अंत्यत गरजेचे आहे. दत्तक घेतलेल्या गावाचा सर्वांगीण विकास व संरचनात्मक कामाचे उद्दिष्टे महाविद्यालयांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शासनाकडून महाविद्यालयांना निधी दिला जातो. आता हा निधी वाटप करण्यापूर्वी महाविद्यालयांनी विशेष शिबिरा दरम्यान गावांमध्ये काय काय विकासाची कामे केली आहेत, याची तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरांचा कालावधी संपल्यानंतर विशेष पथकांमार्फत कामांची तपासणी करून त्याचे अहवाल मागविण्यात येणार आहेत. पहिल्यांदाच हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. पुरेशी कामे केली नसल्यास संबंधित महाविद्यालयांना निधी वाटप करण्यात येणार नाही, असे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)