“एनआरसी’ सर्व देशासाठी करण्याची भाजपची मागणी

नवी दिल्ली – “एनआरसी’ अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या मुद्दयावरून लोकसभेमध्ये सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. “एनआरसी’चा मसुदा प्रसिद्ध झाल्यापासून आसाममधील बंगाली नागरिकांचा छळ केला जात असल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी केला. तर आसाममध्ये गेलेल्या तृणमूलच्या शिष्टमंडळाला रोखण्यात आल्याने देशात “सुपर इमर्जन्सी’ लागू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर “एनआरसी’ पूर्ण देशभरात लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या सदस्यांनी केली. त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले.

शून्य प्रहरादरम्यान भाजपच्या निशिकांत दुबे यांनी “एनआरसी’चा मुद्दा उपस्थित केला. ईशान्य भारत आणि जम्मू काश्‍मीरमधील काही भागात जनगणना होत नसल्याचा दावा दुबे यांनी केला. सर्व देशभर नागरिकांची नोंदणी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली. दुबे यांच्या काही वक्‍तव्यांवर काही विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. सभापती सुमित्रा महाजन यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले.

आसामप्रमाणेच पश्‍चिम बंगाल, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील मुस्लिम आणि हिंदूंनाही “एनआरसी’मधून वगळण्यात आल्याचा दावा तृणमूलच्या सौगत रॉय यांनी केला. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आसाममध्ये प्रत्यक्ष भेट देण्याची मागणीही त्यांनी केली. “एनआरसी’च्या मुद्दयावरून रक्‍तपात होण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी इशारा दिला होता. रॉय यांनी याचा उल्लेख केल्यावरही सभागृहामध्ये गोंधळ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)