“एनआरआय’ जोडप्यांच्या महिला आयोगाकडे तक्रारी वाढल्या

दरमहा पाच ते सहा तक्रारी : पुण्यात “महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

पुणे – पती परदेशात, पत्नी भारतात, पती-पत्नी दोघे परदेशात पण नवरा सांभाळतच नाही, परदेशातील कोर्टाचे आदेश पाळणे अवघड या ना अशा अनेक प्रकारच्या केसेसचे प्रमाण सध्या महिला आयोगाकडे वाढताना दिसत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या वतीने “महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम पुण्यात बुधवारी घेण्यात आला. याला नागरिकांनी प्रतिसादही दिला. यावेळी थेट महिलांच्या प्रश्‍नांची दखल घेण्यात आली. यावेळी रहाटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत त्यांचे प्रश्‍नही सोडविले.

रहाटकर म्हणाल्या, आमच्याकडे दरवर्षी राज्यभरातून साधारण चार ते साडेचार हजार महिलांच्या तक्रारी येतात. यामध्ये जवळपास 60 टक्‍के तक्रारी या कौटूंबीक वादाच्या असतात. यामध्ये ग्रामीण भागात कुटूंबाशी निगडित, तर शहरी भागात पती-पत्नी भांडणाचे प्रकार अधिक दिसून येतात. शहरी भागातील प्रश्‍नांमध्ये सध्या अनेक नव्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. त्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप, समाजमाध्यमांमधून फसवणूक, सायबर गुन्हे, एनआरआय मॅरेजेस, वुमन ट्रॅफिकिंग आदींचे प्रमाण हल्ली मोठ्या प्रमणात आढळते. यामध्ये हल्ली “एनआरआय’ जोडप्यांचे प्रमाण तर मोठ्या प्रमणात वाढलेले दिसत आहे.
अनेकदा परदेशी काम करत असणारा मुलगा भारतीय मुलीशी लग्न करतो व निघून जातो, त्यानंतर तो सर्व संबंध तोडतो. अशा वेळी महिला असहाय्य होतात. तसेच काही वेळा दोघेही जण परदेशात जातात व परदेशात गेल्यावर नवरा बायोकोची साथ सोडतो. तर काही केसेसमध्ये तर पती-पत्नी वाद तेथील कोर्टात जातो व तेथील कोर्टातून मूल सांभाळण्याबाबतचे आदेश दिले जातात. यातील बऱ्याच महिला या परदेशात असहाय्य असतात. त्यांचा खर्च, त्यांचे भारतात परतणे आदी बाबी आम्ही आयोगाच्या मदतीतून करतो, असेही रहाटकर म्हणाल्या. दरम्यान, या सुनावणीच्या निमित्ताने येरवडा येथील महिला जेलमधील कैद्यांसाठी सॅनिटरी वेंडिग मशीनचे वाटप आयोगाकडून करण्यात आले.

“एनआरआय’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद
“एनआरआय’ जोडप्यांच्या तक्रारी, तसेच महिला ट्रॅफिकिंग या दोन्ही विषयांवर दि. 27 जुलै रोजी दिल्लीत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांना येणाऱ्या अडचणी मांडण्यात येणार असून परराष्ट्र मंत्रालयाला याबाबची कल्पना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार असल्याचे रहाटकर म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)