एटीएम म्हणजे रिकामी डबडी

नोट तुटवडा : ग्रामीण भागात अद्यापही शंभर, दोनशेच्या नोटा नाहीत

कापूरहोळ – ज्यांच्याकडं शंभर हायीत त्यांनीच माल घ्या…. बाकीच्यांनी सुट्टं आणा…पेट्रोल टाकायचं तर मोठी नोट काढू नका, नाह्यतं शंभर-दोनशंच टाका… आमच्याकं शंभर, दोनशेच्या नाटा न्हाइत…. नोटांच्या तुटवड्यामुळे वैतागलेल्या लोकांच्या तोंडी असे संवाद गेल्या तीन-चार दिवसांत ऐकू येत होते. देशात नोटाटंचाईची झळ गावागावापर्यंत पोहचली. उलट, आजही गावच्या एटीएममध्ये नोटा कमीच प्रमाणात येत आहेत. यामुळे अजूनही बॅंकात ग्राहकांची गर्दी होतच आहे. बहुतांशी एटीमध्ये खडखडात असल्याने एटीएम म्हणजे वाजणारी रिकामी डबडीच असल्याचा संताप ग्राहकांतून व्यक्त होत आहे.

देशभरातून पैशांची मागणी अचानक वाढल्याने विविध राज्यांत नोटांची टंचाई निर्माण झाली होती. यामध्ये 100, 200 आणि पाचशे नोटातर मिळतच नव्हत्या. देशभरातील 2 लाख 20 हजार एटीएमपैकी 86 टक्‍के एटीएम सुरू झाल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात मात्र आजही वेगळे चित्र आहे. त्यातच 200 रूपयांच्या नोटा ठेवण्यासाठी एटीएम मशीनमध्ये बदल अद्यापही केलेले नसल्याने अशा नोटा शहरात मिळत नाहीत तर ग्रामीण भागात कशा मिळणार? आता, नोटांच्या टंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडूून नव्या नोटांच्या छपाई वेगाने सुरू असली तरी नोटांचा पुरवठा ग्रामीण भागात तेवढ्या वेगाने होत नसल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठेवर नोटाबंदी प्रमाणेच परिणाम झाला आहे.

सध्या, ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी कर्जमाफी अर्ज भरणे, पीक कर्ज घेणे, सोसायट्या, पतसंस्था अशा अर्थसंस्थांचा हप्ता भरणे, अशा कामांची गडबड आहे. तसेच शेतमशागतीची, बि-बियाणांची तयारी सुरू करण्याचे नियोजन असतानाच नोटांचा तुटवडा पडल्याने या कामांत अडथळे येत आहेत. खात्यावर पैसे आहेत पण, खिशात पैसे नाहीत अशी अनेकांची स्थिती झाली आहे. खर्चायला हजार-पाचशे रूपये काढायचे म्हंटले तरी बॅंकांमध्ये तासन्‌ तास रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत. त्यातच काही बॅंका सिल्पां ऐवजी पैसे काढण्याकरिता (विड्रॉल) चेकचा वापर करण्यास सांगतात. त्यामुळे कमी रकमेकरिता गेल्या दोन-चार दिवसांत तेवढेच चेक वापरावे लागले आहेत.

ऐनवेळी पैशांची गरज पडल्यास किमान दहा, बारा एटीएममध्ये गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी पैसे मिळत असल्याचे स्थिती ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागातील गरजा तसेच त्यातून होणारे व्यवहार लक्षात घेता. दोन हजाराच्या नोटेपेक्षा शंभर, दोनशेच्या नोटांवरच व्यवहार चालतो. पण, अशा नोटांचाच तुटवडा सध्या एटीएममध्ये आहे. यामुळे दैनंदिन व्यवहारात अडचणीत कायम आहेत.

दोज हजाराची नोट मोडताना…
नोटा तुटवड्याचा फटका आठवडे बाजारांना बसत आहे. पन्नास-शंभर रूपयांच्या नोटा मिळत नसल्याने किरकोळ खरेदीकरिता दोन हजार, पाचशे रूपयांची नोट मोडणे व्यापाऱ्यालाही अडचणीचे ठरत असल्याने याचा परिणाम बाजारपेठांतील आर्थिक उलाढालीवर होत आहे. बॅंकांनीही पन्नास, पाचशेच्या नोटा द्याव्यात तसेच एटीएमकरिताही नोटांचा पुरवठा तातडीने वाढवावा, अशी मागणी होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)