एज्युकेशनल हब कराडची विद्यानगरी

विजय सुतार

पुण्यापाठोपाठ विद्येची नगरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कराडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण परंपरा जोपासली जात आहे. कराडातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण ग्रहण करायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात परजिल्ह्यासह परप्रांतातील हजारो विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आज कराड परिसरात शेकडो विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्था हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळेच कराडची ओळख आज पश्‍चिम महाराष्ट्रातील एक एज्युकेशनल हब अशी तयार झाली आहे.

महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून परिचित असणाऱ्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी कराड येथील मुरलीधराच्या मंदिरात केली. समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे, मुले शिक्षित झाली तरच विकास प्रकिया सुकर होईल, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ज्ञान, विज्ञान व सुसंस्कार हे ब्रीदवाक्‍य घेऊन या संस्थेची स्थापना करण्यात आली. आज या ज्ञानाच्या गंगोत्रीचा महाराष्ट्रभर प्रसार होऊन संस्थेच्या 300 हून अधिक शाखा लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. या महान संस्थेची स्थापना कराड येथेच झाली असल्यामुळे प्रत्येक कराडकरांची छाती अभिमानाने भरून येते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे. शेतकरी, कष्टकरी कुटुंबामधील मुले शिकली पाहिजे. म्हणून खेडोपाडी जाऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या रयत शिक्षण संस्थेने पहिले मुलांचे वसतिगृह कराड तालुक्‍यातीलच काले येथे सुरू केले. कमवा व शिका या तत्त्वावर आधारित अशी वसतिगृहे सुरू केली, त्याचा फायदा घेऊन गोरगरीब कष्टकरी कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली, परंतु कर्मवीरांच्या संस्थेत शिक्षण घेतलेल्या व वसतिगृहात राहिलेल्या मुलांनी या संस्थेच्या शाखा वाढविण्यासाठी अल्पशा वेतनावर कामे केली. आज रयत संस्थेच्या महाराष्ट्रभर सुमारे 400 हून अधिक शाखा कार्यरत आहेत. सर्वच शाखांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वटवृक्ष आहे. वटवृक्ष ज्या पध्दतीने आपली मुळे जमिनीत रुजवतो व विस्तारत जातो त्याच पध्दतीने अण्णांनी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

कराडमध्ये कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख जयवंतराव भोसले यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुले वैद्यकीय क्षेत्रात नाव कमवावे, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात केली. पूर्वीच्या काळी वैद्यकीय शिक्षण घ्यावयाचे म्हटले की, पुणे, मुंबई किंवा परदेशी शिक्षणासाठी जावे लागत होते. ती काही सांपत्तिक स्थिती मजबूत असणाऱ्या लोकांची मक्तेदारी समजली जात होती. कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात आज सर्वसामान्य, मध्यमवर्गीय मुले-मुली वैद्यकीय शिक्षण घेताना दिसत आहेत. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात परप्रांतीय विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. कराडचे सुपुत्र दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी शेतकरी व जनसामान्य कुटुंबातील मुले-मुली इंजिनिअर झाली तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होणार आहे, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून कराडमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो मुले-मुली नामांकित अभियंते बनली आहेत. कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनीच शहराची भरभराट व्हावी, येथील व्यापारी वर्गांना कोठेही जलद पोहोचता यावे, या उद्देशाने विमानतळाची उभारणी केली. या विमानतळाचा उपयोग वैमानिक प्रशिक्षणासाठी केला जात असतो. येथून अनेक युवक-युवती प्रशिक्षित होऊन पायलट बनली आहेत. कराडमध्ये ज्योतिषशास्त्राचे शिक्षणही दिले जाते.

कराड व पाटण येथे युवकांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहावे म्हणून शासकीय तंत्रनिकेतन (आयटीआय) विद्यालय आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी कराड-पाटण परिसरातील हजारो विद्यार्थी प्रवेश घेत असतात. येथून व्यावसायिक प्रमाणपत्र घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी-व्यवसाय करताना दिसत आहेत. शिक्षण क्षेत्रातील गुरूजन वर्ग तयार होण्याच्या उद्देशाने कराड व पाटण तालुक्‍यात अनेक ठिकाणी डी.एड. कॉलेज, बी. एड. कॉलेजमधून अनेक विद्यार्थी शिक्षक बनत आहेत. विधी महाविद्यालयात वकिलीचे शिक्षण दिले जात आहे. साई सम्राट हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून विद्यार्थ्यांना आधुनिक हॉटेल मॅनेजमेंट तसेच पर्यटनाचे शिक्षण दिले जाते. बनवडी येथे ह. भ. प. महादेव महाराज (खंबाळेकर) यांनी संगीत शास्त्र या विषयात मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.

कराड तालुक्‍यात सुमारे 30 ते 40 शिक्षण संस्थांनी आपल्या शाखा गावागावांत सुरू करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य हाती घेतल्याचे दिसत आहे. मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने शासकीय मुला-मुलींचे वसतिगृह, मिलिटरी बॉईज वसतिगृह तर पाटण येथेही मिलिटरी बॉईज वसतिगृह व अनेक खासगी वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. नव्या युगाची गरज ओळखून कराड परिसरात अनेक इंग्लिश तसेच सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण दिले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)