‘एचसीएमटीआर’ रस्त्याचे काम तीन टप्प्यात

कामाला येणार गती : अंदाजपत्रकात 350 ते 400 कोटींची तरतूद

पुणे – शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा ठरू शकणाऱ्या आणि महापालिकेने तब्बल 40 वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या उच्चक्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) रस्त्याला गती मिळणार आहे. हा रस्ता तीन टप्प्यात करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले असून पहिल्या टप्प्यात बोपोडी ते पौड फाटा या टप्प्यात हे काम सुरू केले जाण्याची शक्‍यता आहे. या कामासाठी आयुक्तांच्या 2019-20 च्या अंदाजपत्रकात तब्बल 350 ते 400 कोटींची तरतूदही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे गेली अनेक दशके केवळ चर्चेत असलेला हा रस्ता प्रत्यक्षात सुरू होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुमारे 32 किलो मीट्‍रचा हा रस्ता असून शहरातील अंतर्गत वर्तुळाकार रिंगरोड म्हणूनही हा ओळखला जातो. हा संपूर्ण रस्ता उन्नत (एलीव्हेटेड) असल्याने महापालिका प्रशासनाने मागील वर्षी त्याचा आराखडा पूर्ण केला होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकल्पासाठी 6 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करावा लागणार आहे. एवढा खर्च करण्याची पालिकेची क्षमता नसल्याने टप्प्याटप्प्याने हा रस्ता विकसित करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली असून त्यांच्याकडून काही पर्यायही सुचविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल तरी, याचे काम सुरुवातीला पालिका आपल्याच निधीतून करणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद केली जाण्याची शक्‍यता प्रशासकीय सुत्रांनी दिली.

तीन टप्प्यात होणार काम 
बोपोडी ते पौड रस्ता दरम्यानच्या आठ किमीवर पालिकेला त्यासाठी सर्वांत कमी भूसंपादन करावे लागण्याची चिन्हे आहेत. तसेच, या दरम्यान अस्तित्वातील रस्त्यावरच उन्नत स्वरुपातील (एलिव्हेटेड) रस्त्याची रचना केली गेली आहे. त्यामुळे, साधारण बाराशे कोटी रुपयांचा हा पहिल्या टप्प्यातील प्रकल्प गतीने पुढे नेता येईल का, याबाबत पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल सादर करणाऱ्या सल्लागाराने रस्त्याच्या खर्चासाठी विविध आर्थिक पर्याय सुचविले आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत त्याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. त्यानंतर आता महापालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन व इतर विभागांनाही नेमकी कोणती जागा लागणार आहे, याचे सविस्तर नियोजन सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)