पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एचए मैदानावर बांधकामाचा राडारोडा टाकला जात असून, आता या राडारोड्याच्या डोंगरात हे मैदान हरवून जाण्याची भीती स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत. एचए कंपनी व्यवस्थापनाकडून यावर कारवाई केली जात नसल्याने यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
पिंपरीची ओळख असलेल्या एचए कंपनीला आर्थिक ग्रहण लागल्यानंतर कंपनीच्या कर्मचारी व अधिकारी वसाहतीला उतरती कळा लागली. या वसाहतीलगतच कंपनीच्या मालकीची मोकळी जागा आहे. परिसरातील नागरिक या मैदानावर वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतात. तर सुट्टीच्या दिवशी या मैदानावर क्रिकेटचे सामने रंगतात. मात्र, कंपनी व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे या मैदानाला देखील आता ग्रहण लागले आहे. या दोन्ही मैदानावर अनेक बाभळीसारखी अनेक काटेरी व जंगली झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. याठिकाणी या झाडांची संख्या अधिक असल्याने दिवसादेखील याठिकाणी जायला कोणी धजावत नाही. मद्यपींचा याठिकाणी वावर असतो. लिंकरोडवरील झोपडपट्टीतील एका सात वर्षाच्या चिमुलकलीचा मृतदेह याठिकाणी आणून टाकला होता. याशिवाय वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे याच परिसरात खून झाले आहेत. रात्री या मैदानातून जाण्यास नागरिक धजावत नाहत.
गेली काही वर्षांपासून या मैदानावर बांधकामाचा राडारोडा टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्री अंधारात अनेक टन राडारोडा या मैदानात टाकला जात आहे. आतापर्यंत शेकडो टन राडारोडा या मैदानावर जमा झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने याला अटकाव केला जात नाही. तर रात्रीच्यावेळी हा राडारोडा टाकला जात असल्याने महापालिकेच्या निदर्शनास ही बा येत नाही. त्यामुळे आता या मैदानावर राडारोड्याचे उंचच उंच डोंगर तयार झाले आहेत. मैदानालगतच्या फुटपाथवर मत्स्य विक्री करणाऱ्या व्यवसायिकांकडून या झुडुपांजवळ मांसाचे भाग टाकले जात असल्याने, भटक्या कुत्र्यांबरोबरच परिसरातील नागरिकांना मांसाच्या तीव्र दुर्गंधीचा देखील सामना करावा लागत आहे.
लिंकरोडवरील सात वर्षाच्या मुलीचा या मैदानावरील झुडुपात मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक नगरसेविका सुजाता पालांडे यांनी या विषयावर महापालिकेच्या सभागृहात चर्चा घडवून आणली होती. मात्र, ही बाब महापालिकेच्या अखत्यारित येत नसल्याने परिस्थिती “जैसे थी’ अशी आहे. विविध कार्यक्रमांसाठी मैदान भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देण्यामुळे आर्थिक स्थिती खालावलेल्या एचए कंपनीला त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र, दुर्लक्षामुळे या मैदानाची दूरवस्था झाली आहे.
सुरक्षा विभागाकडून सहा तक्रारी
एचए कंपनीतील सुरक्षा रक्षकांची संख्या मर्यादीत असली, तरी देखील दिवसा आणि रात्री देखील या मैदानावर गस्त घातली जाते. मात्र, या गस्तीच्या वेळी हे राडारोडा टाकणारे सापडत नसल्याचा सुरक्षा रक्षकांचा अनुभव आहे. तरी देखील राडारोडा टाकल्याची बाब निदर्शनास येताच, अज्ञाताविरोधात पोलिसांत तक्रार दिली जात आहे. आतापर्यंत असा राडारोडा टाकणाऱ्यांविरोधात पाच ते सहा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, आरोपीचे नाव न समजल्याने कोणतीही कारवाई झालेली नाही.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा