एचआयव्हीबाधीत महिलेला कामावर घ्या

कामगार न्यायालयाने औषधनिर्मिती कंपनीला आदेश

पुणे – पुण्यातील एका औषधनिर्मिती कंपनीतील कर्मचारी महिला एचआयव्हीबाधीत असल्याच्या कारणावरून तीन वर्षांपूर्वी तिला कंपनीने कामावरून काढून टाकले. एचआयव्हीबाधीत महिलेने कंपनीच्या निर्णयाच्या विरोधात कामगार न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली. अखेर तिने दिलेल्या लढ्याला यश आले असून तक्रारदार एचआयव्हीबाधीत महिलेला पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत.

-Ads-

तक्रारदार महिलेला कामावरून कमी केल्यानंतरचा पगार तसेच अन्य भत्ते देण्याचे स्पष्ट आदेश कामगार न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. याबाबत एका 32 वर्षीय महिलेने कामगार न्यायालयात खटला दाखल केला होता. तक्रारदार महिला पुण्यातील एका औषधनिर्मिती कंपनीत ऑपरेटर आहे. कंपनीने महिलेकडे वैद्यकीय चाचणी करून याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. वैद्यकीय तपासणीत ती एचआयव्हीबाधीत असल्याचे उघड झाले होते. दरम्यान, याबाबतचा अहवाल कंपनीकडे सादर केला. तेव्हा कंपनीने महिला एचआयव्हीबाधीत असल्याचे कारण देऊन तिला तडकाफडकी कामावरून कमी केले होते. दरम्यान, महिलेने स्वेच्छेने राजीनामा दिल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता.

त्यानंतर महिलेने तिचे वकील अॅड. विशाल जाधव यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. तक्रारदार महिला 2010मध्ये औषधनिर्मिती कंपनीत रूजू झाली होती. तिने वैद्यकीय उपचारांसाठी केलेला खर्च मिळण्यासाठी 4 ऑगस्ट 2015 रोजी तिने कंपनीकडे वैद्यकीय तपासणी अहवाल सादर केला होता. वैद्यकीय तपासणी अहवालात संबंधित महिला एचआयव्हीबाधीत असल्याचे उघडकीस आले होते. त्या दिवशी तिला कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची सूचना केली होती, असे अॅड. जाधव यांनी सांगितले.

कामगार न्यायालयाने कंपनी तसेच तक्रारदार महिलेचे वकील अॅड. जाधव यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर महिलेच्या बाजूने निकाल दिला. कामावरून कमी केल्या दिवसापासूनचा पगार तसेच अन्य भत्ते महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कामगार न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन संबंधित कंपनीने करावे. कंपनीला वरिष्ठ न्यायालयात दाद मागायची मुभा आहे. कंपनीने वरिष्ठ न्यायालयात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला आव्हान दिल्यास पुढील न्यायालयीन प्रक्रिया लढण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे अॅड. जाधव यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)