एक भीषण आरोग्य संकट (भाग- २)

विषाणूसंबंधी
सूक्ष्मजीवशास्त्राच्या वंशावळीनुसार, निपाह हा विषाणू हेनिपाव्हायरस या प्रजातीतील पॅरामिक्‍सोव्हायरिडी या कुलातील सदस्य आहे. त्याला वैद्यकीय परिभाषेत छळत या संज्ञेने ओळखले जाते. ही साथ प्राण्यातून माणसांमध्ये आणि नंतर एका माणसाकडून दुसऱ्याला होत राहते. संशोधनामध्ये सिद्ध झाले की, फळे खाऊन उपजीविका करणाऱ्या एका विशिष्ट वाटवाघळापासून हा पसरतो. संसर्ग झालेल्या वटवाघुळांनी खाल्लेल्या खजुराच्या किंवा फळाच्या संपर्कात आल्याने ही साथ पसरते. मलेशियामध्ये निपाह आजार प्रथम वटवाघळापासून डुकरांना झाला. तो एका डुकरापासून दुसऱ्या डुकरामध्ये पसरला आणि डुकरांपासून माणसांमध्ये पसरला.

लक्षणे कोणती?
या विषाणूचा मानवी शरीरात प्रवेश झाल्यावर 5 ते 14 दिवसात याची लक्षणे दिसू लागतात. यामध्ये रुग्णाला खूप तीव्रतेचा ताप येतो, खूप डोके दुखते, गरगरणे, मळमळ, उलट्या, चक्कर येणे असे त्रास जाणवू लागतात. त्यानंतर रुग्णाला भ्रमिष्टासारखे वाटू लागते आणि आजूबाजूला काय चाललेय याची शुद्ध राहत नाही. लक्षणे दिसू लागल्यानंतर 24 ते 48 तासात रुग्ण बेशुध्द होतो. या रुग्णातील निम्म्या-अधिक रुग्णांना श्वासाचा गंभीर त्रास जाणवू लागतो. या आजाराने 75 टक्‍के रुग्ण मृत्युमुखी पडतात. मात्र या आजारातून बचावलेल्या रुग्णांना आयुष्यभर अपस्माराचे तीव्र झटके येणे, व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल होणे असे त्रास होत राहतात. काही रुग्णांच्या शरीरात निपाह विषाणू प्रवेश करतात, मात्र त्यांना तो आजार लगेच होत नाही. अशा रुग्णांच्या शरीरात घर करून बसलेला हा विषाणू काही वर्षानंतर पुन्हा कार्यान्वित होतो, असेही संशोधकांच्या निदर्शनास आले आहे.

रोगनिदान
संशयित रुग्णांच्या घशाचा आणि नाकातील आतल्या त्वचेला कापूस लावून घेतलेल्या नमुन्याची तपासणी करून हा विषाणू शोधला जातो. त्याचप्रमाणे पाठीतील पाणी (मज्जारज्जूच्या आवरणांमधील द्राव), रक्त, लघवी यांच्या चाचणीतून केले जाते. यासाठी आजाराच्या सुरुवातीच्या काळात रिअल टाईम-पॉलिमरेज चेन रीऍक्‍शन (पीसी-पीसीआर) ही चाचणी केली जाते. तर कालांतराने रुग्णामध्ये नैसर्गिक प्रतिबंधक रसायने (ऍण्टिबॉडीज) निर्माण झाल्यावर एलायझा-आयजीजी आणि आयजीएम या तपासण्या केल्या जातात. रोगनिदान न होता, या आजाराच्या साथीत मरण पावलेल्या व्यक्तींच्या उत्तरीय तपासणीत इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीद्वारे चाचणी करून त्यांच्या मृत्यूचे निदान निपाह विषाणू असल्याची खातरजमा केली जाते.

एक भीषण आरोग्य संकट (भाग- १)

उपचार
निपाह विषाणूचा संसर्ग झाल्यावर होणाऱ्या आजाराचा तसा निश्‍चित उपचार नाही. मात्र यामध्ये रुग्णाला मेंदूज्वर होत असल्याने, त्याला मेंदूज्वरासाठी प्रमाणित असलेले उपचार दिले जातात. यामध्ये रुग्णाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या दृष्टीने त्याला बॅरिअर नर्सिंगच्या तत्वावर इतर रूग्णांपासून पूर्णतः वेगळे ठेवून उपचार केले जातात. इस्पितळातील इतर रुग्णांचा जंतुसंसर्ग (नोझोकोमियल इन्फेक्‍शन्स) या रुग्णाला होऊ नये हा विचारदेखील काटेकोरपणे पाळावा लागतो. काही अल्पप्रमाणात रुग्णामध्ये रिबाव्हिरिन हे औषध उपयुक्त ठरते. मात्र त्याच्या वापराबाबत अजूनही एकमत नाही.

रोगप्रतिबंध
हा आजार टाळण्यासाठी कुठलीही प्रतिबंधक लस अजून तरी उपलब्ध झालेली नाही. परंतु रुग्णाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना, या विषाणूतील जी-ग्लायकोप्रोटीन नष्ट करणाऱ्या ह्युमन मोनोक्‍लोनल ऍण्टिबॉडीज वापरण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. हेनिपाव्हायरस प्रजातीतील हेन्ड्रा व्हायरस या विषाणूचा प्रतिबंध करणारी एक लस ऑस्ट्रेलियामध्ये घोड्यांना देण्यात आली. या लसीमुळे हेंड्रा आणि निपाह या दोन्ही विषाणूंचा प्रतिबंध होऊ शकेल असे काही संशोधकांचे मत आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात या आजाराविरुद्ध लढण्यासाठी एक नवे प्रभावी अस्त्र उपलब्ध होऊ शकेल.

मात्र हा आजार टाळण्यासाठी याची साथ येणाऱ्या प्रदेशात डुक्कर, वटवाघुळ यांचा संपर्क टाळणे आणि खजुराच्या झाडापासून निघणारा रस न घेणे हे उपाय सांगितले जातात. लवकर निदान होऊन त्वरित उपचार केल्यास या आजाराच्या गांभीर्यावर मर्यादा आणता येतात. केरळमध्ये उपचार पथकातील लिनी या परिचारिकेला या आजाराची लागण होऊन तिचा मृत्यू झाला. साहजिकच वैद्यकीय पथकातील डॉक्‍टर्स, नर्सेस आणि इतर सदस्य व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना कसून काळजी घेणे आवश्‍यक असते. त्यांनी रूग्णांची तपासणी करताना ग्लोव्ह्ज आणि प्रतिबंधक मास्क वापरणे आवश्‍यक असते.

या आजाराची साथ असलेल्या भागात फिरताना जर अस्वस्थ वाटले तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन संबंधित चाचण्या करणे अत्यंत आवश्‍यक असते. गेल्या दहा-पंधरा वर्षात एव्हियन फ्लू, सार्स, स्वाईन फ्लू, झिका, एमआरएसए, इबोला अशा कधीही न ऐकलेल्या नावांच्या आणि डॉक्‍टरांनाही तोपर्यंत माहिती नसलेल्या असंख्य भयानक आजारांच्या साथी येऊन गेल्या. मात्र त्यासाठी त्या आजारांची योग्य माहिती सर्व नागरिकांना देऊन त्यांना प्रतिबंधक उपायांचे ज्ञान देणे आणि त्यांच्यातील आरोग्य सजगता वाढवणे आजमितीला अत्यावश्‍यक झाले आहे.

डॉ. अविनाश भोंडवे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)