एक पाऊल सकारात्मकतेचे

ऍड. सुचित्रा घोगरे-काटकर

व्यक्‍तितील कलागुणांना प्राथमिक अवस्थेत प्रोत्साहन, प्रेरणा मिळणे अवघडच. लहान मुलांच्या कलागुणांचे कौतुक होते, परंतु कलेचा विकास होण्यासाठी प्रोत्साहन मिळत नाही. त्यातही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुले असतील तर कला, साहित्य हे आपले काम नव्हे असे नकारात्मक सुर ऐकवले जातात. घर आणि शाळेतही कला गुणांना कोणतेच पोषक वातावरण नसते. कौतुक, प्रोत्साहनाऐवजी नकारात्मक प्रतिसादामुळे अनेकांच्या मनातील कला, कल्पना प्राथमिक अवस्थेतच खुडून टाकल्या जातात.

पाथर्डी तालुक्‍यातील सोमठाणे बु. या छोट्याश्‍या गावातील संतोषमधील कवी असाच खुडला गेला असता. पण आईने प्रोत्साहन दिले आणि तो लिहित राहिला. पुस्तकातील कविता शिकताना संतोष सातवीत असताना छोट्या छोट्या कविता करू लागला. लिहलेल्या कविता शिक्षकांना वाचायला दिल्या. की या कोणाच्या कविता आहेत ? असे शिक्षक विचारत. मी केल्यात या कविता, असे संतोषने सांगितल्यावर शिक्षक विश्‍वास ठेवत नव्हते. तु आणि कविता केली ? शक्‍यच नाही. तुला त्यातील काय कळते असे म्हणून त्याला निराश करत शिक्षकांचे हे बोलणे ऐकून मन खुप निराश व्हायचे. आत्मविश्‍वास खचायचा.

शेवटी संतोषने आपल्या अल्पशिक्षित आईला कविता वाचून दाखवायला सुरूवात केली. आई वेगवेगळ्या गोष्टी, कथा, दंतकथा सांगायची. त्या कथा ऐकून यातील काही कविता केलेल्या असायच्या. आईला आपल्या मुलाचे अप्रूप वाटत. कविता वाचून दाखविली की ती पाठीवर हात फिरवून त्याचे कौतूक करायची. लिहित रहा, खुप नाव करशील असं म्हणून प्रोत्साहन देत. शिक्षकांच्या बोलण्याने निराश झालेले मन आईच्या कौतुकाने, प्रोत्साहनाने सकारात्मक विचार करू लागले. आपण चांगले लिहितोय अशी सकारात्मक भावना निर्माण झाल्यावर संतोष लिहित राहिला.

बारावीत असताना अनुराधा औरंगाबादकर यांनी कवी ग्रेस यांच्यावर लिहिलेला लेख वाचला. तो लेख आवडल्याचे व ग्रेस यांच्यासारखे कवी होण्याची इच्छा त्यांना पत्र लिहून व्यक्‍त केली. त्यांनी पत्राच्या उत्तरार्धात लेखनाचे कौतुक करून तुमचाही एक दिवस येईल अशा शब्दात प्रोत्साहन दिले. याच कालावधित महावीर जोंधळे यांचे लेखन वाचले. त्यांनाही पत्र लिहिल्यावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पुढे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड याचा सहवास लाभला आणि संतोष लिहित गेले. यातून उधळण हा कवितासंग्रह प्रसिध्द झाला. उसावले रान हा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. वास्तवाचे भान देणाऱ्या कधी मर्मावर बोट ठेवणाऱ्या तर कधी वंचित समाजाचे चित्र मांडणाऱ्या या कविता आहेत.

आज संतोष यांचा एकीकडे करिअर, नोकरी यासाठी संघर्ष चालला आहे, तर दुसरीकडे कवितेचा प्रवास चालू आहे. आपल्या कवितेच्या या प्रवासाविषयी संतोष दौंड म्हणतात आज हा सारा प्रवास स्वप्नवत वाटतो. पण वेळोवेळी सकारात्मक विचार देणाऱ्या व्यक्‍तींनी निराशेकडे झुकणारे पाऊल सकारात्मकतेने टाकायला प्रोत्साहन दिले. यातूनच मी लिहित गेलो. स्वप्न वास्तवात उतरवायला प्रबळ इच्छाशक्‍ती बरोबरच आपण सकारात्मकतेने पाऊल उचलायला हवे. तेंव्हाच आपण आपल्यातील कला गुणांना वाव देऊ शकता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)