एक पाऊल सकारात्मकतेचे

ऍड. सुचित्रा घोगरे-काटकर

“दुष्काळामुळे स्थलांतराला सुरुवात. कामाच्या शोधात अनेकजण पुण्याकडे’ सकाळी वर्तमानपत्र हातात पडल्यावर या शीर्षकाची बातमी वाचली. मनात विचारचक्र सुरु झाले. आज रोजीरोटीसाठी स्थलांतरितांचे लोंढेच्या लोंढे शहराकडे वाहत आहेत. दिवसेंदिवस कमी होत चाललेले पर्जन्यमान, उपजिविकेची तुटपुंजी साधने अशा विविध कारणांमुळे पोटपाण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांची पावले शहराकडे वळत आहेत. प्रत्येक वर्षी शहरांकडे स्थलांतरित होणाऱ्या लोकांची संख्या पाहता “खेड्याकडे चला’ हा महात्मा गांधींचा मंत्र हरवला आहे असेच दिसते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“चला खेड्याकडे’ असे म्हटले की, काय उरलंय तुमच्या खेड्यात? शहरात सर्व काही मिळत असताना कोण येणार खेड्यात? का आणि कशासाठी यावं? असे प्रश्‍न उपस्थित केले जातात. यामुळे शहराकडून पुन्हा खेड्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या किती? हा संशोधनाचा विषय होईल. या विचारात असतानाच संध्याकाळी “चला खेड्याकडे’ या गांधींच्या हाकेला साद देणाऱ्या रेवंडे गावाच्या प्रमोद भोसले यांची भेट झाली. कमवा व शिका या तत्वाचा अवलंब करत रसायनशास्त्र विषयात पदवीत्तर शिक्षण आणि एम. बी. ए. झाल्यावर त्यांना मुंबईत अत्तर बनविणाऱ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. खचखळग्यातील वाटेवर सुरु झालेल्या जीवनप्रवासात महत्त्वाच्या टप्प्यावर स्थिरावत असतानाच एक दिवस त्यांनी अचानक “यू टर्न’ घेतला आणि पुन्हा गावाकडची वाट धरली ती शेती करण्यासाठी, शेतात सुगंध पिकविण्यासाठी.

आज मोठ्या प्रमाणात लोक शहरांकडे जात आहेत. अशा स्थितीमध्ये तुम्ही गावाकडे परत येण्याचे पाऊल कसे काय उचलले? असे प्रमोद यांना विचारले असता ते म्हणाले आपण इथे जे प्रोडक्‍ट विकतोय ते शेतीतील उत्पादनातून येत आहे. मी शहरात बसून जे काम करतोय ते काम गावाकडे शेती करून करू शकतो, असे नोकरी करताना एक दिवस लक्षात आले आणि नोकरी सोडून मी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. शहरातील सुखवस्तू जीवन सोडून पुन्हा गावाकडे येऊन शेती करण्याचा निर्णय आजच्या काळात तो शुद्ध वेडेपणा मनाला जातो. प्रमोद गावाकडे येऊन शेती करतात त्याला पाच वर्षे झाली. तरीही अजून लोक त्यांना वेड्यात काढतात. परंतु ते त्याची अजिबात पर्वा करत नाहीत.

“शहरे ही खेड्यांवरच चालली आहेत. खेडी संपली तर शहरे थांबतील. इथे भरपूर पडीक जमीन आहे. ती मला विकसित करायची आहे. मी शेतीत जे प्रयोग करतोय ते नाविन्यपूर्ण आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ते आदर्श असणार आहेत’ असे आत्मविश्‍वासाने सांगणाऱ्या प्रमोद यांच्या शेतीतील प्रयोगामुळे गावातील वीस व्यक्ती पुन्हा शेतीकडे वळल्या आहेत. सुगंधी वनस्पतींची लागवड आणि त्यावर प्रकिया करण्याचा उद्योग त्यांना सुरु करायचा आहे. करिअर, पैसा, सेटलमेंट याला चिकटून न बसता स्वतःच्या अंतर्मनातील आवाजाला प्रतिसाद देत प्रमोद यांनी शेतीकडे वळवलेले हे सकारात्मक पाऊल भविष्यात तरुणांसाठी आदर्श आणि शेतकऱ्यांचे जीवन सुगंधी करणारे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)