एक पाऊल सकारात्मकतेचे

ऍड. सुचित्रा घोगरे-काटकर

आपल्या कलेचे सर्वांनी कौतुक करावे, वाहवाह करत आपल्या सादरीकरणाला दाद मिळावी असे प्रत्येक कलाकाराला मनापासून वाटत असते. खरं तर ही दाद त्याचा उत्साह वाढविणारी, प्रोत्साहन देणारी ठरते. अनेक कलाकारांना रसिकांकडून भरभरून दाद मिळते. याचबरोबर कलेतून पैसा, प्रसिद्धी, नाव मिळते. परंतु हे फारच थोड्या कलाकारांच्या वाट्याला येते. बहुतांशी कलाकार मात्र यापासून वंचित राहतात. असे असले तरी प्रत्येक कलाकार त्याच्या कलेवर मनापासून प्रेम करतो. त्या कलेची मनस्वी साधना करत असतो. आपल्यातील कलेची जोपासना करताना जिथे संधी मिळेल तिथे हे कलाकार तितक्‍याच उत्साहाने, तन्मयतेने त्यांची कला सदर करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पैसा प्रसिद्धी, प्रतिसाद यापासून ते दूर असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर असणाऱ्या सळसळत्या उत्साहातून त्यांचे कलेवरील प्रेम, कालेसाठीची तपस्या, साधना दर्शवित असतो. त्यात कोणती खंत नसते, खेद नसतो की निराशा नसते. असे अनेक कलाकार आपले सर्वस्व अर्पून कलेची साधना करत असतात ते केवळ कलेवरील त्यांच्या निस्सीम प्रेमापोटी. असाच एक कलाकार मला भेटला एका विवाहाच्या स्वागत समारंभात. तसा माझा आणि गाण्यांचा विशेष असा संबंध येत नाही. मला गाण्यातील फारसं कळतही नाही. काही आवडती गीते सोडली तर इतर गीते कितीही मोठ्या आवाजात आसपास वाजत असली तरी ती माझ्या कानात शिरत नाहीत. याबाबत मी अरसिक आहे असे म्हंटलं तरी चालेल.

पण त्या स्वागत समारंभातील ऑर्केस्ट्रामधील तो गायक आपल्या मधुर आवाजात खूपच सुंदर गीते सादर करत होता. त्यामुळे माझे लक्ष आपोआपच त्याच्याकडे गेले. कधी नव्हे ते मी अशा ऑर्केस्ट्रामधील गाणी अगदी मन लावून ऐकली. त्या गीतांची पार्श्‍वभूमी, चित्रपटातील किस्से, इतर संबंधित माहितीही तो आपल्या निवेदनातून सांगत होता. स्वागत समारंभाला आलेले लोक एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होते. गीत संपल्यावर शिष्टाचार म्हणून दोन चार टाळ्या वाजवाण्याव्यातिरिक्त कोणीही आवर्जून त्याला दाद देत नव्हते. तरीही तो त्याच तन्मयतेने गाताना पाहून मला आश्‍चर्य वाटले. शेवटी मी न राहून मी त्यांच्या जवळ गेले व लोक फारसा प्रतिसाद देत नाहीत, मैफलीत मिळणाऱ्या टाळ्या इथे मिळत नाहीत, तरीही तुम्ही इतक्‍या तन्मयतेने कसे काय गाता? असा प्रश्‍न त्यांना विचारला. त्यावर ते म्हणाले मी माझ्या कलेसाठी गातो. माझे प्रत्येक सादरीकरण अधिकाधिक उत्तम कसे होईल याला महत्त्व देतो.

यास मिळणारा प्रतिसाद माझ्यासाठी महत्वाचा आहेच. पण त्याहीपेक्षा माझ्या हातून होणारी कलेची उपासना, साधना ही मला अधिक महत्वाची आहे. टाळ्या मिळत नाहीत म्हणून निराश न होता प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने गाणे सदर करणाऱ्या या कलाकारातील ही सकारात्मकता पाहून मी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. कलेची जोपासना करताना कितीही अडचणी आल्या तरी आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करत सदैव नवनिर्मितीचा ध्यास घेतलेला कलाकार हा सकारात्मकतेचे खळखळता झरा असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)