एक पाऊल सकारात्मकतेचे

– ऍड. सुचित्रा घोगरे-काटकर

आजच्या काळात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून नावापुढे लागलेल्या पदव्या हा मोठा मापदंड व मानदंडही ठरला आहे. शिवाय शिक्षण आणि नोकरी म्हणजेच करिअर या संकुचित व्याख्येमुळे पाल्याने जास्तीत जास्त शिकून पदवी मिळवलीच पाहिजे हा पालकांचा अट्टाहास असतो. परंतु एखाद्याने ते पारंपारिक, साचेबद्ध शिक्षण घेतले नाही, परीक्षा पद्धतीतून पदव्या मिळवल्या नाहीत तर त्याचं करिअर घडत नाही असे मुळीच नाही. शिक्षण नाही म्हणून त्याचे जीवन दीन-दुबळे होत नाही.

पदवी नसतानाही स्वतःतील बुद्धिमत्ता, कर्तृत्व सिद्ध करून यशस्वीपणे करिअर करता येते. फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा एवढेच. हे वाचून तुम्ही म्हणाल “सांगणे, लिहिणेही सोपे असते. प्रत्यक्षात मात्र आजच्या काळात असे जगणे अवघड आहे. त्यामुळे अशा काल्पनिक गोष्टी लिहित जाऊ नका. पण मी भेटले आहे अशा अनेकांना. ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नसताना स्वतःचे जीवन यशस्वी केले आहे. यातीलच एक दौलत. आमच्या आर्याबाग सांस्कृतिक परिवाराच्या सदस्य माणिकताई जाधव यांचा हा मुलगा. प्राथमिक शाळेत असताना त्याची चूक नसताना केवळ गैरसमजातून शिक्षकांनी त्याला मोठी शिक्षा केली. यामुळे तो मनाने ढासळला. शिक्षक, शाळेविषयी भीती बसली.

अभ्यासातील आवड कमी झाली. हे पाहून त्याला उगीचच ताण द्यायचा नाही. त्याच्यावर काहीही थोपवायचे नाही. शिकून पदवी मिळवलीच पाहिजे हा अट्टाहास करायचा नाही असे माणिकताईंनी ठरविले. दहावी झाल्यावर शिक्षण थांबविण्याच्या निर्णयावर आई म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्या. उच्च शिक्षित पालकांच्या मुलाने फक्त दहावीपर्यंतच शिकणे हे समाजाच्या दृष्टीने पालकांचे मोठे अपयशच.

याबाबत माणिकताई सांगतात तुझ्यामुळे मुलाचे शिक्षण नीट झाले नाही. शिकला नाही तर कसे होणार? वगैरे वगैरे नातेवाईकांची बोलणी मलाही ऐकावी लागली. समाजच्या नजरांना सामोरे जावे लागले. एका वळणावर मी निराश झाले होते. पण त्यावेळी मी सकारात्मक विचार केला. मी फक्त माझ्या मुलाचा आनंद बघितला. “मला माझ्या मुलाला आनंदी करायचं आहे, जगाला नाही’, असा मी विचार केला. ज्याला ज्ञान मिळवायचे तो कुठनही ज्ञान मिळवतो. आपल्या मुलामध्ये ती ऊर्जा आहे. त्यामुळे शिक्षण घेतलेच पाहिजे असा पालक म्हणून आम्ही हट्ट केला नाही. शिक्षण महत्त्वाचे आहेच. परंतु भाषा आणि आकडेमोड करता आली पाहिजे. व्यवहार ज्ञान पाहिजे.

चतुरता पाहिजे. हे सगळं पारंपारिक शिक्षण घेतले म्हणजेच मिळते असे नाही. तर या सर्व गोष्टी मिळणारं शिक्षण महत्त्वाचे. आणि हेच सगळं मी माझ्या मुलाला देण्याचा प्रयत्न केला. आज तो त्याच्या व्यवसायात आणि जीवनातही यशस्वी वाटचाल करत आहे. कुटुंबवत्सल, सज्जन, गरजूंना मदत करणारा सहृदयी माणूस म्हणून तो समाजात लोकप्रिय व लाडका आहे. त्याच्याकडे कोणतीही पदवी नसली तरी मी दौलतच्या बाबतीत खूप समाधानी आहे. म्हणूनच शिक्षणात आवड नसणाऱ्या मुलांच्या पालकांनी तू पदवी घेतलीच पाहिजे हा अट्टाहास सोडून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी माणिकताईंसारखे सकारात्मक पाऊल उचलले पाहिजे असे मनापासून वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)