एक पाऊल सकारात्मकतेचे

ऍड. सुचित्रा घोगरे-काटकर

आजचे हे सकारात्मकतेचे पाऊल विशेष मुल असल्यामुळे निराश झालेल्या पालकांसाठी… घरात विशेष मुल असणं हे पालकांसाठी, कुटुंबासाठी अडचणीची गोष्ट. त्यातही आईसाठी हे खूपच अवघड आणि वेदनादायी असते. बाळास जन्मताच अपंगत्व, एखादा गंभीर आजार, मतिमंदत्व वा गतिमंदत्व, अजून काही कमतरता आहे हे स्वीकारणे फार कठीण जाते. काही ठिकाणी बाळाबरोबर पालकही अपंग आहेत की काय? इतकी हतबलता त्यांच्यामध्ये दिसून येते. बहुसंख्य पालकांमध्ये वास्तव न स्वकाराल्यामुळे दीन, दुबळी, नकारात्मक भावना आणि आयुष्यभराचे रडगाणे दिसते.

अलीकडच्या काळात हे चित्र बदलत असून काही पालक आपल्या मुलाचे हे विशेषत्व, त्यांच्यातील अपंगत्व स्वीकारून त्यास सकारात्मकतेने सामोरे गेले आहेत. स्वतःच्या मुलासाठी काम करताना त्याच प्रकारच्या मुलांसाठीही त्यांनी खूप मोठे काम उभारले आहे. यापैकी एक म्हणजे अंबिका टाकळकर. आपला मुलगा स्वमग्न आहे हे कळल्यावर टाकळकर दांपत्य सुरुवातीला निराश, दु:खी झाले. पण त्यांनी स्वतःला लगेच सावरले. मुलाच्या भवितव्यासाठी जे जे करता येईल त्याचा अभ्यास करत वेगवेगळ्या थेरपी, उपचार सुरु केले. स्वतः नवनवीन प्रयोग केले. यातून औरंगाबादमध्ये स्वमग्न मुलांसाठी “आरंभ’ ही संस्था उभी राहिली.

स्वमग्न मुले आणि त्यांच्या पालकांसाठी अंबिकाताई आणि त्यांचा मुलगा श्रीहरी रोल मॉडेल आहेत. आरंभ मधील विविध उपक्रमाबरोबरच विशेष मुल असलेल्या पालकांसाठी त्या समुपदेशनाचे महत्वाचे काम करतात. अंबिका ताई म्हणतात विशेष मुल जन्माला आले तर आयुष्यच संपवून टाकलं जातं. मागे उरते ती फक्त आयुष्यभराची फरफट. त्यातही आईची फरफट अधिकच. तिला कायम दोषी ठरविले जाते. मुलाच्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत अशी अपराधी भावना तिच्या मनाला आयुष्यभर चिकटून राहतो. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक पालकाला मी हेच सांगत असते की आयुष्य खूप सुंदर आहे. ते जगायला शिका.

विशेष मुल जन्माला आलं म्हणून आयुष्य संपलंय असं नाही तर त्याचे जास्तीचे विविध रंग आयुष्यात आलेत. जे खऱ्या अर्थाने आपल्याला समृद्ध करतात. कदाचित दिशा बदलत असतील, समीकरण चुकलेले असेलही. पण ते कसं हे आपण ठरवायला हवं. रडत बसण्यापेक्षा विशेष मुलासोबतही जगता आले पाहिजे. माझ्याशिवाय याचे काहीच होणार नाही या भ्रामक कल्पनेतून बाहेर पडून मी नसतानाही तो आनंदाने आयुष्य कसा जगेल यावर जास्त लक्ष केंद्रित करता आले पाहिजे. आयुष्य सुंदर नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा त्याला सुंदर बनविण्याची एक संधी आपल्या हातात आहे.

फक्त त्या संधीचं सोनं करता आले पाहिजे. आणि महत्वाचे म्हणजे अनेक छोटे-छोटे क्षण स्वतःला अट्टाहासाने जगता आले पाहिजेत. जोपर्यंत आपल्या स्वतःला जगता येणार नाही तोपर्यंत समोरच्याला जगणं शिकवता येणार नाही. कोणत्याही प्रकारचे विशेष मुल असलेल्या पालकांनी अंबिकाताईंच्या या विचारातून एक सकारात्मकतेचे पाऊल उचलून आपल्या मुलाचे आणि स्वतःचे जीवन सुंदर करावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)