एक पाऊल सकारात्मकतेचे

– अॅड. सुचित्रा घोगरे-काटकर

दिसणं हे महत्त्वाचे नाही, असणं महत्त्वाचे असे नेहमीच म्हटले जाते. तरीही लोक नेहमी दिसण्यालाच प्राधान्य देतात. चार व्यक्ती एकत्र आल्या की ती व्यक्ती नाकीडोळी कशी दिसते आणि तिचा रंग कसा आहे हे हमखास पहिले जाते. मग ते स्त्री असो वा पुरुष. प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा भेटली की बहुतांशी वेळा ती दिसते कशी ? हे पाहून ग्रह केले जातात. समाजाच्या या मानसिकतेमुळे अनेकांना आपल्या स्वतःच्या दिसण्याबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. आणि हा न्यूनगंड म्हणजेच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाविषयीची नकारात्मक भावना व्यक्तिमत्व विकासाच्या आडवा येतो.

दिसण्याला प्राधान्य देणाऱ्या समाजाच्या या मानसिकतेला तिलाही सामोरे जावे लागले होते. नाकी डोळी छान असली तरी रंगाने ती इतरांपेक्षा गडद होती. तिच्या आसपासच्या सर्व मुली रंगाने गोऱ्या. त्यामुळे इतरांच्या लेखी ती सुंदर नव्हती. तिच्या दिसण्यामुळे तिला एकतर दुर्लक्ष केले जायचे किंवा दुजाभावाची वागणूक मिळायची. आपल्या दिसण्याविषयी लोक काय बोलतात हे तिने अनेकदा ऐकले होते. लोकांच्या या प्रतिक्रियांवरून आपण दिसायला चांगले नाहीत त्यामुळे आपण काही करू शकणार नाही अशी नकारात्मकता तिच्या बालमनावर कोरली गेली. यातून मनात न्यूनगंड तयार झाला.

जो तिच्या व्यक्तिमत्व विकासाच्या आड येऊ लागला. एक दिवस तिच्या शाळेतील एका कार्यक्रमात एक वक्ते व्यक्तिमत्व विकासावर भाषण करत होते. व्यक्तिमत्वातील दिसणे हा एक भाग आहे. व्यक्तिमत्व अनेक विविध घटकांनी बनते. यामध्ये तुम्ही बोलता कसे, काय बोलता, वागता कसे, तुमचा अभ्यास, हुशारी, बुद्धिमत्ता, स्वभाव, वर्तणूक, आचरण हे घटक महत्त्वाचे ठरतात. हे ज्याला समजते तो स्वतःकडे आणि इतरांकडेही याच धारणेने बघतो. रंग, रूप, यावरून त्या व्यक्तीचे दिसणे ठरविले जाते. पण व्यक्तिमत्व ठरविताना कधीच ती व्यक्ती कशी दिसते हे पहिले जात नाही तर तर ती कशी आहे हे पहिले जाते यात तिचे आचार विचार, हुशारी, बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती स्वभाव घटकांना प्राधान्य दिले जाते. त्यांचे हे भाषण ऐकून तिच्या मनातील स्वतःच्या दिसण्याविषयीची नकारात्मक भावना क्षणात निघून गेली. दिसणं हे वरवरच आहे आपलं असणं महत्वाचं. हे तिने स्वतःच्या मनाला सांगितले. त्याप्रमाणे विचारांमध्ये सकारात्मक बदल केला.

आपले दिसणे, कौटुंबिक परिस्थिती, आसपासचे वातावरण या घटकांवर मात करत ती अभ्यास करत राहिली. आज तिने तिच्या आवडीच्या शिक्षण क्षेत्रात करिअर केले आहे. कधी काळी तिच्या दिसण्याला प्राधान्य देऊन लोक तिला जवळ करत नव्हते. आज मात्र तिच्या भोवती विद्यार्थ्यांचा सतत गराडा असतो. तिच्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची ती आवडती शिक्षिका आहे. आणि विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही. तिचं दिसणं तिच्या कामाच्या कधीच आड आलेले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)