‘एक निर्णय’च्या निमित्ताने श्रीरंग देशमुखांचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

नववर्षासाठी प्रत्येकजण काहीतरी संकल्प करतो, एखादा निर्णय घेतो. असाच एक निर्णय अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी घेतला. ‘एक निर्णय’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने श्रीरंग देशमुख मराठी चित्रपटाच्या लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. नव्या वर्षात त्यांचा ‘एक निर्णय’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

विविध टप्प्यांवर घेतलेले वेगवेगळे निर्णय माणसाच्या आयुष्याची दिशा ठरवतात. कधी ते निर्णय इतरांसाठी असतात तर कधी स्वतःसाठी असतात. अशाच स्वतःसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर भाष्य करणारा ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट येत्या १८ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असून त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने मी आता एक एक पाऊल टाकत आहे. माझ्या सगळ्या आप्तस्वकीयांची साथ आणि गुरूंचे आशीर्वाद यांच्यामुळेच मी माझ्या ध्येयापर्यंतचा हा प्रवास करू शकलो. चित्रपटाचा विषय हा सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल’, असा विश्वास दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांनी व्यक्त केला.

चित्रपटाच्या कथेला पूरक आणि पोषक अशी चार वेगवेगळ्या मूडची गाणी ‘एक निर्णय’ या चित्रपटात आहेत. अंजली मराठे, ऋषिकेश कामेरकर, निहिरा जोशी-देशपांडे, जयदीप वैद्य, श्रुती आठवले या सुप्रसिद्ध गायकांनी ही गाणी गायली असून, गाण्यांचे गीतकार वैभव जोशी तर संगीतकार कमलेश भडकमकर आहेत. रोहन श्रीरंग देशमुख याने सुद्धा चित्रपटातील एक गाणं संगीतबद्ध केले आहे.

सुबोध भावे, मधुर वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, कुंजीका काळवींट या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. स्वरंग प्रॉडक्शनची ही पहिलीच निर्मिती आहे. १८ जानेवारीला ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)