एक दुरूस्ती झाली, आता बाकीच्यांकडे पण बघा!

वाहतूक शाखेचा स्वैर कारभार ( भाग ३ )

सुधीर पाटील

कराड – वाहतूक शाखेतील एका महिला कर्मचार्याबाबत बर्याच तक्रारी आल्याने आणि त्याची सार्वत्रिक चर्चा झाल्याने त्या महिला कर्मचार्याची फक्त कार्यालयीन कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे एक दुरूस्ती झाली असली, तरी बाकीच्या तीन-चार जणांबाबतही वरिष्ठांकडून ठोस कारवाईची अपेक्षा वाहनधारकांना आहे.

वाहतूक नियंत्रण शाखेच्या कामकाजाबाबत शंका असण्याचे कारण नाही. या शाखेचे कामकाज आजच्या घडीला सर्वोत्तम आहे. मात्र, चांगल्या कामकाजाला गालबोट लावण्याचे काम काही जणांकडून होत आहे. तुपात तळले आणि साखरेत घोळले, तरी कारले कडू ते कडूच. या म्हणीप्रमाणे वरिष्ठांनी कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी ट्रॅफीक शाखेतील काही कर्मचार्यांच्या स्वभावात बदल होत नाही.

कोल्हापूर परिक्षेत्रात कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेचा डंका वाजत आहे. तो कायमच रहावा. तथापि, यशस्वी कामगिरीला तडे जाऊ नयेत, म्हणूनही काही खबरदारीचे उपाय योजायला हवेत. उपविभागीय स्तरावर दि. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या दरम्यान पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रार अर्जांची निर्गती आणि संपूर्ण परिक्षेत्रात वाहतूक कारवाईबाबत सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल कराडचे उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांचा ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि छ. शाहू महाराज आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यामुळे कराड उपविभागाचाही सन्मान झाला आहे. याचे भान ठेऊन या सन्मानाचा मान राखणारी कामगिरी यापुढे अधिकारी आणि कर्मचार्यांकडून व्हायला हवी. ट्रॅफीक शाखेला वाहतूक नियम आणि दंडात्मक कारवाई संदर्भात नागरीकांचे प्रबोधन करण्याचा वाव आहे. अशा माध्यमातून समाजात मोटर वाहन कायद्याबाबत जागृती झाल्यास ट्रॅफीक शाखेचेही काम हलके होईल आणि वाहनधारकांच्याही नियम आणि कायद्याचे महत्व लक्षात येईल.
उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचा कोल्हापूर परिक्षेत्रात झालेला सन्मान कौतुकास्पद आहे.

याच प्रमाणे ट्रॅफीक शाखेतल्या कर्मचार्यांनीही चांगल्या कामाद्वारे सामान्यांच्या कौतुकाचे धनी व्हावे. उध्दट महिला कर्मचाऱ्यास कार्यालयीन कामकाज देऊन उपअधीक्षकांनी एक दुरूस्ती केली. याबद्दल त्रासलेल्या नागरीकांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलेच. शिवाय अन्य चार-पाच जणांच्या टोळीवरही उपअधीक्षकांनी लक्ष ठेवावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)