एक ग्रॅममध्येही झळाळी

स्त्री आणि दागिने यांचं एक अतूट नातं अगदी पूर्वापार चालत आलेलं आहे. पूर्वी दागिने किंवा अलंकार म्हटले की डोळ्यांसमोर केवळ सोन्याचेच दागिने यायचे. नखशिखांत सोन्याचे दागिने, पण सोन्याचे दागिने कालांतराने केवळ सण-समारंभापुरतेच किंवा बॅंक लॉकरपुरतेच मर्यादित राहिले आणि त्यांची जागा चांदी, मोती, डायमंडपासून ते अगदी रंगीत मण्यांनी घेतली. असं असलं तरीही या दागिन्यांनी स्त्रीला भुरळ घातली नाही तरच नवल!

स्त्रीच्या अप्रतिम सौंदर्यात मोलाची भर घालणारे सोन्याचे दागिने आज परंपरेनुसार नावीन्याच्या कस उलगडताना दिसतात. परंपरागत दागिन्यांचा नवा आविष्कार आज नवनवीन डिझाईन्सच्या माध्यमातून स्त्रीमनाला भुरळ घालताना दिसून येतो. असं म्हटलं जातं, स्त्रीचं सौंदर्य हे सोन्याच्या दागिन्यांनीच खऱ्या अर्थाने खुलून येतं. या दागिन्यांतून प्रतीत होणाऱ्या स्त्रीसौंदर्याचा आविष्कार अगदी अवर्णनीयच मानावा लागेल. अलीकडे एक ग्रॅम सोन्याचे दागिने वापरण्याची फॅशन दिसून येते. एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, हातातील बांगड्या ते अगदी नेकलेसपर्यंतचे दागिने रेग्युलर वापरापासून सण समारंभापर्यंत वापरले जातात.

पारंपरिक वेशभूषेपासून अगदी नवीन फॅशनच्या जगतातही एक ग्रॅम सोन्याचेच दागिने वापरले जाताना दिसून येतात. एक ग्रॅम सोन्याच्या हारांमध्येही अगदी विविध प्रकारची कलाकुसर केलेली दिसून येते. आपल्या पसंतीनुसार हव्या त्या स्वरूपात हे दागिने उपलब्ध असतात. ही ज्वेलरी सेटनुसार ड्रेस, साडीवरही परिधान केली जाऊ शकते. काही हलक्‍या वजनाचे तर काही भरगच्च स्वरूपाचे दागिने सोन्याच्या दागिन्यांच्या बरोबरीने आपला ठसा उमटवताना दिसतात.

एक ग्रॅम सोन्याच्या वस्तूंमध्ये विविध कलाकुसरींप्रमाणे आपल्याला हव्या त्या डिझाईन करून घेता येतात. कधी कधी हे दागिने आणि सोन्याचे खरे दागिने यातील फरक ओळखता येत नाही. सण, समारंभ, त्याचप्रमाणे गिफ्ट म्हणूनही एक ग्रॅम सोन्याचे दागिने हे वापरले जाऊ शकतात. विशेषत: नोकरदार महिलांमध्ये एक ग्रॅम सोन्याचे दागिने, खास करून मंगळसूत्र हे रोजच्या प्रवासात वापरण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये एक पदरी मंगळसूत्राप्रमाणेच मोठी मंगळसूत्र, मणी, विविध पानांमधील डिझाईनमध्ये उपलब्ध असलेली दिसून येतात. विशेषत: हातातील बांगड्यांमध्ये एक ग्रॅमचे सोने वापरण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. हौस म्हणून हे दागिने वजनदार स्वरूपात तयार केले जातात. या दागिन्यांमध्ये विविध रंगांचाही वापर केलेला दिसून येतो. नेकलेस तसेच कानातील रिंग, कुडी तसेच हव्या त्या डिझाईनमध्ये सेट उपलब्ध असलेले दिसून येतात.

एक ग्रॅम सोने हे जसे विविध दागिन्यांमध्ये वापरले जाऊ शकते, त्याचप्रमाणे एक ग्रॅम सोन्याच्या वस्तूदेखील आपण घरात बनवून शोसाठी ठेवू शकतो. या वस्तू मनोवेधक आणि आकर्षक वाटतात. विशेषत: मुली, महिला हे दागिने कार्यक्रमाच्या निमित्ताने आधिक वापरताना दिसतात. आजकाल एक ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये इतके हरतऱ्हेचे प्रकार पाहायला मिळतात, लहान-मोठे, विविध रंगांचे दागिने पाहायला मिळतात. आणि मुख्य म्हणजे चोरीची भीतीही नाही. कारण अगदी एक ग्रॅमचं जरी घालायचं झालं तरी चोरांना ते खरं वाटत असल्यामुळे ते मारण्याची भीती असतेच. खोट्या दागिन्यांचं मात्र तसं नसतं. दुसरं असं की प्रत्येक ड्रेसवर आणि अगदी साडीवरही हे अगदी हुबेहूब रंगांत मिळत असल्यामुळे ते घालण्याकडेही महिलांचा अधिक कल दिसून येतो. अलंकाराने स्त्रीचं सौंदर्य अधिक खुलतं. मग ते दागिने कोणत्याही प्रकारचे असो. त्यांची भुरळ स्त्रीला पडली नाही तरच नवल!

– श्रुती कुलकर्णी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)