‘एक्‍सप्रेस वे’ची पिंपरी-चिंचवडमध्ये दुरवस्था

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वे महामार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी या रस्त्याचे काम करणारी रिलायन्स कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि. 23) खडसावले. या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी जागेवर जाऊन महामार्गाची दुरवस्था दाखवली. दुरवस्था तातडीने दूर करण्यासोबतच महामार्गालगत तातडीने सुशोभिकरण करण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली.

महामार्ग सहापदरी करण्याचे काम रिलायन्स कंपनीला मिळालेले आहे. या कंपनीमार्फत सध्या काम सुरू आहे. हा महामार्ग पिंपरी-चिंचवड शहराच्या वाकड ते रावेत-किवळे या भागातून जातो. या ठिकाणी महामार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे सुशोभिकरण करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे या महामार्गाच्या शेजारचे सर्व्हिस रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे.

या सर्व बाबींची दखल घेऊन आ. लक्ष्मण जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाचारण केले होते. या बैठकीत त्यांनी महामार्गाच्या पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील दुरवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला. दुरवस्था दूर करण्यासाठी पुरेसे लक्ष दिले जात नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुशोभिकरण करण्यासाठी आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अशा प्रकारचा निष्क्रिय कारभार यापुढे खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना निक्षून सांगितले.

या वेळी माजी नगरसेवक विनायक गायकवाड, नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्‍वर भोंडवे, रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापक बी. के. सिंग व अधिकारी उपस्थित होते.

प्रलंबित कामे मार्गी लावणार
आमदार जगताप हे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जागेवर गेले. अधिकाऱ्यांना जागोजागी महामार्गाची पाहणी करायला लावली. वाहनचालकांना येथील ग्रेडसेपरेटरची झालेली दुरवस्था, सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था, महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे, वाकड ते रावेत-किवळे दरम्यान एकाही ठिकाणी महामार्गाजवळ न केलेले सुशोभिकरण त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवले. सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)