एकेरीत भारताच्या सिद्धांत बांठियाला विजेतेपद

थायलंडच्या मनचया सवांगकिइला दुहेरी मुकुट; एचसीएल आशियाई टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा 2018 

पुणे – एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना (आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना (एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना (एआयटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत मुलांच्या गटात एकेरी गटात भारताच्या सिद्धांत बांठिया याने तर, मुलींच्या गटात थायलंडच्या मनचया सवांगकिइ हिने दुहेरी व एकेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात भारताच्या चौथ्या मानांकित सिध्दांत बांठीयाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीनने 6-1, 6-4 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 1तास 5मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये सिद्धांतने सुरेख सुरुवात करत दुसऱ्याच गेममध्ये सेर्गेयची सर्व्हिस ब्रेक केली व 2-0अशी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरपर्यॅंत आपली आघाडी कायम ठेवत सिद्धांतने सहाव्या गेममध्ये सेर्गेयची पुन्हा एकदा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-1असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसरा सेट फार रंगतदार ठरला.

या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व चौथ्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या त्यामुळे सामन्यात 2-2 अशी स्थिती निर्माण झाली. सिद्धांतने पुढच्याच गेममध्ये सेर्गेयची सर्व्हिस भेदली व आघाडी घेतली. सहाव्या गेममध्ये सिद्धांतने 15-30 असे गुण असताना दोन बिनतोड सर्व्हिस केल्या व स्वतःची राखत 4-2अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सेर्गेयने पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत आठव्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-4अशी बरोबरी साधली. पण आघाडीवर असलेल्या सिद्धांतने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत नवव्या गेममध्ये सेर्गेयची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. लक्ष्य-भारत फोर्ज यांचा पाठिंबा असलेला सिद्धांत हा पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे आणि केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

यावेळी विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना सिद्धांत म्हणाला कि, माझ्या कुमार गटांतील कारकिर्दीतील हा सर्वोत्तम विजय आहे. मला हि स्पर्धा जिंकायचीच होती. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मी सर्व सामने आत्मविश्वासाने खेळले असून डेक्कन जिमखाना येथील टेनिस कोर्ट हे माझ्या खेळाच्या शैलीशी सुसंगत ठरते. स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीच्या लढती माझ्यासाठी अटीतटीच्या होत्या. कारण दोन्ही खेळाडू अव्वल मानांकित खेळाडू होते. त्यामुळे माझ्यावर दडपण तर होतेच, पण त्याचबरोबर या कोर्टवर खेळण्याची सवय असल्यामुळे मी त्यानुसार माझा खेळ केला.

मुलींच्या गटात अंतिम फेरीत थायलंडच्या तिसऱ्या मानांकित मनचया सवांगकिइने इंडोनेशियच्या चौथ्या मानांकित प्रिस्का मॅडेलिन नुगरोचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यात पहिल्या सेटमध्ये मनचयाने दुसऱ्या, चौथ्या व आठव्या गेममध्ये प्रिस्काची सर्व्हिस रोखली व हा सेट टायब्रेकमध्ये 7-6(5)असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मनचयाने अधिक भक्कम सुरुवात करत प्रिस्काची पहिल्या, तिसऱ्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मनचया हि सुपाणबुरी स्पोर्टस शाळेत दहावी इय्यतेत शिकत असून पिरॅमिड टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक योदचाई कॉंग कुंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूंना 280 आयटीएफ गुण व करंडक, तर उपविजेत्या खेळाडूंना 170 आयटीएफ गुण व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ऑलंम्पियन व आशियाई सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ, एचसीएलचे सुंदर महालिंगम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, स्पर्धा सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल : अंतिम फेरी : मुले – सिध्दांत बांठीया (भारत) (4) वि.वि. सेर्गेय फोमीन (उझबेकिस्तान) (2) 6-1, 6-4
मुली – मनचया सवांगकिइ (थायलंड) (3) वि.वि. प्रिस्का मॅडेलिन नुगरो (इंडोनेशिया) (4) 7-6(5), 6-3.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)