एकीकडे वन्य प्राण्यांची तस्करी, तर दुसरीकडे जीवदान

वकिल अनिलकुमार आरोटे यांच्याकडून घोरपडला जीवदान
अकोले – एकीकडे वन्य प्राणी व पशूंची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असताना एका सुजाण वकिलाने त्याच्या उलट पाऊल उचलले. आपल्या आगळ्या वेगळ्या व्यक्‍तिमत्त्वाचे दर्शन घडवले. दुर्मिळ पण तितकीच वनौषधी प्रकाराची “घोरपड’ जंगलात सोडून “पर्यावरण वाचवा’ हा शुभ संदेश त्यांनी दिला.
येथील ख्यातनाम वकिल अनिलकुमार आरोटे यांनी मानवतेच्या दृष्टीने विचार करून आपल्या खिशाला कात्री लावून अतिशय दुर्मीळ होत चाललेल्या घोरपडीला जीवदान दिले. घोरपड या प्राण्याला मारण्यामागे समाजात अनेक समज आहेत. घोरपडीपासून एक विशिष्ट प्रकारचे तेल बनवण्यात येते व ते तेल सांधेदुखी वर लावल्यास सांधेदुखी पूर्णपणे बरी होते, असा समज आहे. घोरपडीचे तेल वातविकारांवर उपयोगी पडते अशा गैरसमजुतीतून घोरपडींची हत्या केली जाते. अशाच कारणासाठी तस्करी करणाऱ्या लोकांच्याकडून ऍड. आरोटे यांनी अतिशय दुर्मिळ होत चाललेल्या घोरपडीला मरणाच्या दारातून बाहेर आणून जंगलात सुरक्षीत सोडून दिल्याने वन्यजीवप्रेमी व प्राणीमित्रांनी धन्यवाद दिले.
सोमवारी सकाळी ऍड. अनिलकुमार आरोटे हे आपल्या कामाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्‍यातील एका खेड्यात गेले होते. तेथे त्यांना काही आदिवासी लोक वन्यजीवाची शिकार करून तो प्राणी विक्री करताना दिसून आले. यामुळे उत्सुकता म्हणून ऍड. आरोटे यांनी चौकशी केली असता त्यांना एका पिशवीत अतिशय दुर्मीळ होत चाललेला घोरपड हा प्राणी संबंधित लोकांकडे आढळून आला. साधारणपणे अडीच ते तीन किलोग्रॅम वजनाची व विटकरी रंगाची ही घोरपड सुमारे तीन फूट लांबीची असल्याचे दिसून आले. यावेळी ऍड. आरोटे यांनी संबंधीतांना त्या प्राण्याला किती रूपयांत विकायचे आहे, अशी विचारणा केली असता त्यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान झालेल्या चर्चेत ऍड. आरोटे यांनी तस्करी करणाऱ्या लोकांना वन्यजीव संरक्षण कायदा समजावून सांगितला. तसेच वन्य प्राण्याची तस्करी करणाऱ्या लोकांना वनविभाग किंवा पोलीस ताब्यात घेऊन चौकशी करून कारवाई करू शकतात, याचीही माहिती दिली. वन्यजीव बंदिस्त करून त्यांची हत्या करण्याचा प्रकार फौजदारी गुन्हा असल्याचे सांगून अशा गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले जाते अशीही माहिती दिली. यामुळे घोरपडीला पकडणारे तस्कर घाबरल्याने पिशवीसह पळून जाऊ लागले.
यावेळी ऍड. आरोटे यांच्या अंकुश माताडे व अंतून घोडके या चालकांनी संबंधिताना अडवले. घोरपडीला खरेदी करण्याचा व गुन्हा दाखल करणार नसल्याचा विश्‍वास देऊन ती घोरपड ऍड. आरोटे यांनी रोख पाच हजार रुपयांना विकत घेतली. यानंतर ऍड. आरोटे, अंकुश माताडे व अंतून घोडके यांनी ही खरेदी केलेली घोरपड सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास अकोले तालुक्‍यातील विठे घाटातील जंगलात सुखरूपपणे सोडून जीवदान दिले. यावेळी अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक व अध्यक्ष विजय पोखरकर, उपाध्यक्ष शांताराम काळे, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष अमोल वैद्य, पत्रकार गणेश आवारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)