एकीकडे इंधन दर कपात, दुसरीकडे सिलिंडर महागले!

पिंपरी – दोन महिन्यांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दराने नव्वदी गाठली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात हळूहळू कपात होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु, गॅस सिलिंडरचे दर दिवसें-दिवस वाढत असल्याने शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसू लागली आहे. नोव्हेंबर महिन्यात गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दोन महिन्यांपूर्वी अचानक वाढल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली होती. मात्र, राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केल्याने पेट्रोल पाच रुपये तर डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतरही, आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांच्या किंमती पाहता हळूहळू दर उतरत असल्याने सर्वसामान्य नागरिकाचा आर्थिक त्रास कमी झाला आहे. परंतु, गॅसच्या भरमसाठ दरवाढीमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले असून नोव्हेंबर महिन्यांत गॅसचा दर 932 रुपये एवढा झाला आहे.

एप्रिल महिन्यापासून गॅसच्या दरामध्ये तब्बल 287 रुपयांची वाढ झाल्यामुळे शहरवासियांना महागाईची झळ बसू लागली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अनुदानावर गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला. मात्र, दर महिन्याला सिलिंडरचे भाव वाढत असून नोव्हेंबर महिन्यामध्ये सिलिंडरने 932 हा उच्चांकी आकडा पार केला आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात नागरिकांची सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सततच्या भाववाढीने सरकारचे योग्य ध्येय साध्य झाले नसल्याचे दिसून येते. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीतून काही प्रमाणात दिलासा मिळताच पुन्हा वाढत्या गॅस सिलिंडरच्या दरामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनताही मेटाकुटीस आली आहे. नागरिकांना नऊशेहून अधिक रक्कम देऊन सिलेंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागात चुलीवरती स्वयंपाक करणे सुरु आहे. तसेच, गॅसच्या अनुदानाची रक्कमही बहुतांश नागरिकांच्या खात्यावर वेळेवर जमा होत नसल्याचे कित्येक नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रत्येक महिन्याला गॅस दरवाढ होत असल्याने महिन्याचे आर्थिक बजेट सांभाळताना कसरत करावी लागत आहे. तसेच, सरकारचे थेट खात्यावरील अनुदानाची रक्कम वेळच्या-वेळी जमा होत नाही. सरकारने सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा पध्दतीने सिलिंडरचे दर ठेवणे अपेक्षित असल्याचे, स्वाती रानमोडे या महिलेने सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)