एका बंदोबस्तासाठी सातशे ते सव्वासातशे मानधन

राज्य शासन आणि मुख्य कार्यालयाकडून निर्णय : सर्वोच्च न्यायालयाचा दणका

पुणे – गेल्या कित्येक वर्षांपासून हंगामी तत्वावर आणि तुटपुंज्या मानधनात काम करणाऱ्या होमगार्ड जवानांना आर्थिक बळ देण्याचा निर्णय राज्य शासन आणि होमगार्ड दलाच्या मुख्य कार्यालयाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर होमगार्ड जवानांच्या मानधनात वाढ करण्याचे संकेत राज्य शासन आणि प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार या जवानांना एका बंदोबस्तासाठी किमान सातशे ते सव्वासातशे रुपये मानधन मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

होमगार्ड जवान हा पोलिसांचा उजवा हात समजला जातो. याच होमगार्ड जवानांच्या मदतीने राज्यभरातील पोलिसांनी भले भले बंदोबस्त लिलया पार पाडले आहेत. विशेष म्हणजे आपत्तीच्या घटनांवेळी या जवानांनी पोलिसांना हातभार लावला आहे. त्यामुळेच होमगार्ड जवान सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय झाला असून त्याच्याबद्दल समाजामध्ये आदरयुक्त भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हे वास्तव असले तरी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत या जवानांची आर्थिक पिळवणूक झाली आहे. बारा ते तेरा तास बंदोबस्त करूनही या जवानाला आहार भत्ता आणि मानधन असे अवघे चारशे रुपयांचे मानधन मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांची ही नोकरी हंगामी स्वरुपाची असून हा बंदोबस्त केला तरच त्याला मानधन मिळत आहे. त्यामुळे हा जवान आर्थिक विवंचनेत अडकला आहे. ही बाब लक्षात घेऊन या जवानांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी होमगार्डचे जवान आणि त्यांच्या संघटनांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, राज्य शासनाची आणि राज्यकर्त्यांची उदासीनता यामुळे या मागणीला गेल्या कित्येक वर्षांच्या कालावधीत मूर्त स्वरुप मिळाले नाही.

याबाबत काही संघटना आणि होमगार्ड जवानांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये अन्य राज्य आणि तेथील होमगार्डच्या जवानांना देण्यात येणारे मानधन यांचे दाखले देण्यात आले होते. होमगार्ड जवान हा पोलिसांच्या खांद्याला आणि बहुद्या त्यांच्यापेक्षाही जास्त काम करत असतो. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन या जवानांना बंदोबस्ताचे किमान सातशे ते सव्वासातशे रुपये मानधन देण्यात यावे, असे या याचिकेत नमूद केले होते. ही याचिका ग्राह्य धरून याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन त्याची पूर्तता करण्यात येईल, अशी माहिती होमगार्डचे महासमादेशक संजय पाडें यांनी दिली.

“त्या’ राज्यांच्या धर्तीवर कार्यवाही करावी
होमगार्ड जवान हा पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतो. त्यांच्या मदतीमुळेच पोलिसांना बळ मिळत असते. त्याशिवाय आपत्तीच्या घटना आणि अन्य दुर्घटनांच्या प्रसंगी होमगार्डचा जवान हा स्वत:चा जीव धोक्‍यात घालून इतरांसाठी देवदूत बनत असतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच राजस्थान, मध्यप्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यांनी होमगार्डच्या जवानांना सेवेत कायम केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही याच धर्तीवर होमगार्ड जवानांना सेवेत कायम करण्यात यावे, अशीही मागणी होमगार्ड जवानांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)