एकाच महाविद्यालयात शिकविण्याचे बंधन

प्राध्यापकांच्या मानधन वाढीनंतर कामावर आल्या मर्यादा

पुणे – राज्य शासनाने महाविद्यालयात तासिका तत्त्वावरील काम करणाऱ्या सहायक प्राध्यापकांचे मानधन वाढविले असले तरी आता प्राध्यापकांना एकाच महाविद्यालयात शिकविण्याचे निर्बंधही घालण्यात आले आहेत. यामुळे प्राध्यापकांचे मानधन वाढले असले तरी कामावर मर्यादा घालण्यात आल्यामुळे प्राध्यापक मोठ्या पेचात सापडले आहेत.

राज्यात एकूण 1 हजार 171 अनुदानित महाविद्यालये असून ती दहा विभागांत विभागलेली आहेत. या महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती अनेक वर्ष बंद होती. यामुळे तात्पुरत्या व्यवस्थेसाठी तासिका तत्त्वावर सहायक प्राध्यापकांच्या नेमणुका करण्यात आल्या. या प्राध्यापकांच्या मानधनात गेल्या दहा वर्षांत कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे वाढ करण्याच्या मागणीसाठी विविध प्राध्यापक संघटनांनी अनेकदा आंदोलनेही केली. अखेर शासनाने मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय घेत दिलासा दिला आहे.

शासनाने पदवी व पदव्युत्तर स्तरावरील कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण या विविध शाखांमधील सहायक प्राध्यापकांचे मानधन वाढवत असताना कठीण निर्बंधही घातले आहेत. आतापर्यंत बहुसंख्य प्राध्यापक किमान दोन-तीन महाविद्यालयांत काम करत होते. त्यामुळे दरमहा त्यांना पुरेसा पगार मिळत होता. आता मात्र त्यांना एका पेक्षा जास्त महाविद्यालयात कामच करता येणार नाही. त्याबाबतचे प्रतिज्ञापत्रच प्राध्यापकांनी महाविद्यालयात सादर करण्याचे बंधनही नव्याने घालण्यात आले आहे. एका प्राध्यापकाला आठवड्याला नऊ तासिकांपेक्षा जास्त तासिकाही घेता येणार नाहीत. वाढलेल्या मानधनानुसार आता एका प्राध्यापकाला किमान 18 हजार ते 22 हजार रुपयांपर्यंतच पगार मिळणार आहे. यापेक्षा जास्तीचा पगार कोणालाही मिळणार नाही.

प्राध्यापकांकडून तीव्र शब्दात नाराजी
अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन हे राज्य शासनाकडून महाविद्यालयांना अदा करण्यात येत असते. प्रथम व द्वितीय सत्र यानुसार दोन टप्प्यांत एकत्रित मानधनाचा प्रस्ताव महाविद्यालयांना उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठवावा लागतो. या प्रस्तावाची तपासणी करूनच अनुदान वाटप करण्यात येणार आहे. एकीकडे शासनाने मानधन वाढविले असले तरी जाचक निर्बंध घातल्यामुळे प्राध्यापकांपुढे मोठे संकटच उभे राहिले आहे, त्यामुळे बहुसंख्य महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)