एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपान्त्य फेरी गाठणारी पहिली जपानी जोडी

ओसाका, निशिकोरी यांनी घडविला इतिहास ; अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा

न्यूयॉर्क: विसावी मानांकित नाओमी ओसाका आणि 21वा मानांकित केई निशिकोरी या जपानी खेळाडूंनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारताना नवा इतिहास घडविला. एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील महिला व पुरुष एकेरीत जपानी खेळाडूंनी उपान्त्य फेरी गाठण्याची वेळ 22 वर्षांनंतर आली आहे. ओसाका आणि निशिकोरी या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर परस्परविरुद्ध शैलीत विजय मिळविला.

केवळ 20 वर्षीय नाओमी ओसाकाने युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया त्सुरेन्कोचा 6-1, 6-1 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडविताना कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली. तर 29 वर्षीय केई निशिकोरीने क्रोएशियाच्या सातव्या मानांकित मेरिन सिलिचचा कडवा प्रतिकार 2-6, 6-4, 7-6 (7-5), 4-6, 6-4 असा मोडून काढताना उपान्त्य फेरीत धडक मारली.

1-2 अशा पिछाडीवरून सिलिचने चौथा सेट जिंकून 2-2 अशी बरोबरी साधली, तेव्हा 2014 मधील लढतीची पुनरावृत्ती होण्याचीच चिन्हे दिसत होती. परंतु निर्धाराने खेळणाऱ्या निशिकोरीने पाचव्या सेटवर पहिल्यापासूनच नियंत्रण राखले. चौथ्या गेममध्ये सिलिचची सर्व्हिस भेदून त्याने 3-1 अशी आघाडी घेतली. इतकेच नव्हे तर 5-2 अशी आघाडी घेण्यासाठी निशिकोरीकडे दोन गेमपॉइंटही होते. मात्र दुहेरी चूक करताना त्याने ही संधी गमावली आणि सिलिचने आपली पिछाडी 3-4 अशी कमी करण्यात यश मिळविले.

परंतु 10व्या गेममध्ये पुन्हा एकदा सिलिचची सर्व्हिस भेदताना निशिकोरीने विजयाची पूर्तता केली. मी आज प्रत्येक गुणासाठी झुंज देत होतो, असे सांगून निशिकोरी म्हणाला की, सिलिचविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागणार हे मला माहीत होते. परंतु पराभव मला मान्यच नव्हता. या विजयामुळे निशिकोरीने सिलिचविरुद्धच्या आपल्या आकडेवारीत 9 विजय आणि 6 पराभव अशी सुधारणा केली.

त्याआधी ओसाका व निशिकोरी या दोघांनी एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरी गाठताना जपानसाठी ऐतिहासिक कामगिरी केली होती. हा मान मिळविणारी ही पहिलीच जोडी ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निशिकोरीने सातत्यपूर्ण कामगिरी करताना प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच लोकप्रियता आणि प्रकाशझोत या बाबतीतही तो जपानमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. परंतु ओसाकाने या वेळी उपान्त्य फेरी गाठताना निशिकोरीच्या साथीत जगभरातील टेनिसशौकिनांचे आकर्षण ठरण्याचा मान मिळविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)