एकाचवेळी 137 गड-किल्ल्यांवर दुर्गपूजा

महारष्ट्रसह नऊ राज्यांतील 131 तर परदेशातील सहा किल्ल्यांचा समावेश

राजगुरुनगर- दुर्गसंवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था व किल्ले भोरगिरी संवर्धन समिती यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला “ऐतिहासिक दुर्गपूजा सोहळा’ भोरगिरी (ता. खेड) येथील भोरगड किल्ल्यावर रविवारी (दि. 24) उत्साहात पार पडला. संस्थेचे दुर्गपूजेचे हे 22वे वर्ष असून या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतीतील इतर नऊ राज्यांतील 131 पेक्षा अधिक गड-किल्ल्यांवर व परदेशातील 6 किल्ल्यांवर एकाचवेळी विविध सरदार, संस्थानिक व राज घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ऐतिहासिक दुर्गपूजा करण्यात आली.
कागल-कोल्हापूर येथील ऐतिहासिक घाटगे सरदार घराण्याचे वंशज पृथ्वीराज घाटगे व शिवाजी ट्रेलचे संचालक तथा किल्ले भोरगिरी भोरगड संवर्धन समितीचे अध्यक्ष सचिन तोडकर यांच्या हस्ते भोरगड किल्ल्यावरील लेण्यांमध्ये असणाऱ्या शिवमंदिरात ही ऐतिहासिक दुर्गपूजा पार पडली. यावेळी प्राजक्‍ता घाटगे, सूर्यन घाटगे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे, ज्ञानेश्‍वर बडे, अक्षय कडू, ओंकार भालेराव, सचिन इंगोले यांच्यासह शिवप्रेमी व दुर्गप्रेमी उपस्थित होते. या वर्षीही महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, जम्मू, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, दमण, गोवा आदी राज्यातील 131 पेक्षा अधिक गड-किल्ल्यांवर तर भारताबाहेरील सिंगापूर, ओमन, कॅनडा, अमेरीका, जर्मनी, दुबई या देशांमध्येही प्रत्येकी एका किल्ल्यावर दुर्गपूजा करण्यात आली. दुर्गपूजेसाठी निवडण्यात आलेल्या देशभरातील 131 किल्ल्यांपैकी सुमारे 50 किल्ल्यांवरील दुर्गपूजेस शिवकालीन सरदार, संस्थानिक व राज घराण्यातील वंशज उपस्थित होते, अशी माहिती शिवाजी ट्रेलचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद क्षीरसागर यांनी दिली.
चौकट : गेल्या वर्षीपासून विदेशात सुरुवात
एकाचवेळी गडकिल्ल्यांवर दुर्गपूजा करण्यास 2013मध्ये प्रारंभ करण्यात आला. 2014 मध्ये 14, 2015 मध्ये 81 गड-किल्ल्यांवर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुर्गपूजा पार पडली.. फक्त महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर होणारी शिवाजी ट्रेलची ही दुर्गपूजा 2016 मध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, पंजाब, केरळ व तामिळनाडू मधील 121 गड-किल्ल्यांवर पार पडली. 2016 च्या दुर्गपूजेची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेत विक्रमाची नोंद केली होती. 2017 मध्ये 123, 2018 मध्ये देशभरातील 125 किल्ल्यांसह प्रथमच विदेशातील सिंगापूर येथील दोन किल्ल्यांवर दुर्गपूजा करण्यात आली होती, अशी माहिती ट्रेलचे विश्‍वस्त विनायक खोत यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)