एकाकीपणा निर्मूलनासाठी मंत्री?

विश्ववेध : एकनाथ बागूल

व्यक्‍तिगत जीवनात एकाकी किंवा पूर्ण निराधारपणा वाट्याला येणे ही अतिशय दुर्दैवी व मन विषण्ण करणारी घटना समजावी लागेल. ब्रिटन या एकमेव देशाला या आधुनिक समस्येने ग्रासले आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु या संदर्भात ब्रिटिश सरकारने योग्य उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र मंत्री नियुक्‍त करण्याचे पाऊल उचलले हे खरोखरच अद्‌भूत, अभूतपूर्व आणि आश्‍चर्यकारक म्हणावे लागेल.

संगणक, डिजिटल, फेसबुक, मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया इत्यादी शब्दांच्या अलंकारांनी नटलेल्या आधुनिक जगाकडे पाहताना सामान्य माणसे अतिशय थक्‍क झाली आहेत. परंतु एकीकडे त्याबद्दल विज्ञानयुगाचे कौतुक होत असताना समस्त सामान्य जनाचे सामाजिक जीवन अगदी इंग्लंडसारखा अग्रगण्य अत्याधुनिक देश चालू घडीला त्याच बदलामुळे कमालीचा समस्याग्रस्त बनला आहे. ही समस्या अर्थातच विशेष गंभीर तर आहेच.

ही समस्या इतर सर्वच अत्याधुनिक, प्रगत आणि प्रगतीशील समजल्या जाणाऱ्या देशांच्या राज्यकर्त्यांना देखील अक्षरश: अस्वस्थ आणि चिंतातूर बनविणारी ठरली असणार यात शंकाच नाही. जगातील पातळीवर ही समस्या तशी प्रातिनिधिक ठरू शकणारी असली तरी इंग्लंडला म्हणजेच ब्रिटनला एव्हाना जास्तच भेडसावणारी ठरली आहे. त्यामुळेच नुकताच 17 जानेवारी रोजी ब्रिटिश सरकारने देशाच्या मंत्रिमंडळामध्ये त्या अत्याधुनिक गंभीर सामाजिक समस्येशी मुकाबला करण्यासाठी देशभर वाढत चाललेल्या मानवी जीवनातील “एकाकीपणावर’ (लोन्लीनेस) प्रभावी उपाय करण्यासाठी “मिनिस्टर फॉर लोन्लीनेस’ नावाच्या नव्या पदासाठी एक पूर्णवेळ स्वतंत्र मंत्री नियुक्‍त करण्याचा निर्णय जाहीर केला.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरसा मे यांनी त्याबाबत बोलताना सांगितले की, संपूर्ण देशामध्ये लक्षावधी देशबांधव आजच्या घडीला एकाकी आयुष्याशी सामना करीत आहेत. त्या सर्व दुर्दैवी जीवांना आधार शोधण्यासाठी कोणत्या उपाययोजना करावयाच्या याबाबतची कामगिरी एका स्वतंत्र मंत्र्याकडे अर्थात मिनिस्टर फॉर लोन्लीनेसकडे सोपविण्यात येणार आहे. ब्रिटिश समाजामध्ये आढळणारे एकाकीपण वयोवृद्ध नागरिकांच्या वाट्याला ज्या विविध कारणास्तव येत आहेत त्यामध्ये जीवन साथीदाराचा अकाली मृत्यू, स्वत:च्या मुलामुलींचे स्वतंत्र संसार, नातवंडांच्या व नातेवाईकांच्या सहवासाचा अभाव, नातलगांचे तुटलेले संबंध आणि कुटुंबातील अविवाहित तरुण-तरुणींचा स्वतंत्र, अनिर्बंध जीवनात मश्‍गूल होण्याकडे कल अशा विविध कारणांचा समावेश आहे.

मुख्यत: स्वावलंबी आणि संपूर्ण व्यक्‍तिस्वातंत्र्याला म्हणजेच मनमानी जीवन जगण्याबद्दल अग्रही असलेल्या विद्यमान ब्रिटिश तरुणाईचा ओढा खरे म्हणजे नवा नसून गेल्या अनेक दहशकांपासून अस्तित्वात असला तरी एव्हाना त्यामध्ये दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढ होत आहे, हे पाहून खुद्द तेथील राज्यकर्तेदेखील चिंताग्रस्त झाले आहेत.

ब्रिटनच्या एकूण 6 कोटी 6 लाख लोकसंख्येपैकी 90 लाख नागरिकांच्या वाट्याला निराधारपणा म्हणजे एकाकी किंवा एकटेपण आल्याचे “रेडक्रॉस’ या सेवाभावी ब्रिटिश संस्थेने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आढळल्याची नोंद आहे. त्या नोंदीमधील सर्वाधिक महत्त्वाच्या कारणामध्ये सेवानिवृत्ती, जोडीदाराचा मृत्यू, घटस्फोट किंवा आप्तजनांचे वेगळे राहणे या घटनांचा समावेश अधोरेखित झाला आहे.

निराधार अथवा एकाकी जीवन कंठणाऱ्या अभागी स्त्री-पुरुषांच्या समस्येची गंभीरपणे दखल घेण्यात ब्रिटिश सरकारने घेतलेल्या पुढाकाराचे श्रेय “जो क्रॉक्‍स’ फौंडेशन नावाच्या नव्या एका बिनसरकारी संस्थेस द्यावे लागेल. ही संस्था ब्रिटिश संसदेमधील विरोधी मजूर पक्षांच्या दिवंगत नेत्या जो क्रॉक्‍स यांच्या स्मरणार्थ त्यांच्या किम नावाच्या बहिणीने नुकतीच स्थापना केली आहे. दिवंगत जो क्रॉक्‍स यांच्या स्वत:च्या वाट्यालाही ऐन तरुण वयापासूनच एकाकीपण आले होते आणि केंब्रिज विद्यापीठात शिकत असताना त्यांनी स्वत:देखील मानवी जीवनातील एकाकी जीवनाचा कटू अनुभव घेतला होता. शिवाय संसदेमध्ये विरोधी पक्षाचे नेतृत्व करीत असताना एका खुनीहल्ल्यात दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:चे प्राण गमावले हे देखील येथे आवर्जून नमूद केले पाहिजे.

इतर कांही सर्वेक्षणांमधील निष्कर्षांनुसार ब्रिटनमधील 75 वयोगटामधील अंदाजे निम्मे स्त्री- पुरुष नागरिक सध्या एकाकी (लोन्ली) आयुष्य कंठत आहेत. त्या सर्व दुर्दैवी जीवांचा अनेक दिवस किंवा अनेक आठवडे अन्य कोणत्याही व्यक्तींशी संपर्क नसतो, अगदी कोणाशीही ते एकही शब्द दिवसभरात बोलत नसतात, असेही संबंधित निरीक्षणावरून सरकारच्या निदर्शनास आले आहे.

आधुनिक जीवनाचा अंगीकार जगाच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत ब्रिटनप्रमाणेच पोहोचणे यथावकाश अटळ असले तरी त्याचा संपूर्ण मानव जातीवर नजीकच्या काळात परिणाम होण्याची शक्‍यता मुळीच नाकारता येत नाही.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)