एकही रूग्ण पैशाअभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही

कोल्हापूर – राज्यातील एकही रूग्ण पैशाअभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही या दृष्टिने आवश्यक ती व्यवस्था राज्य शासनाने प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सर्वसामान्य, गोरगरीब लोकांच्या उपचारांसाठी 650 कोटी रूपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केले

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय, मुंबई यांच्या वतीने व श्रीमंत छत्रपती शाहू कारखाना लिमिटेड कागल, राजे विक्रमसिंह घाटगे फांऊडेशन तसेच को. ऑपरेटीव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्ष प्रमुख, डॉ. ओमप्रकाश शेटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, सिध्दगिरी मठाचे मठाधिपती मुप्पीन काडसिध्देश्वर स्वामी, आडीचे परमात्मराज महाराज, निडसोशीचे श्री शिवलिंगेश्वर स्वामी, गोकूळचे संचालक बाबा देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाने गोर-गरीब जनतेसाठी  आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून 1200 आजारांसाठी दीड लाखाची मदत केली जात आहे. याशिवाय दुर्धर आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सहाय्य केले जात आहे. जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून 400 शालेय विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात येत आहेत. यामधील 57 विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया मुंबई येथे करण्यात येणार असून 16 रूग्णांची पहिली बॅच मुंबईला पाठवली आहे. 6 जणांवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून उर्वरीत मुलांवर प्राधान्याने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. हा सर्व खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा बरोबरच वेगवेगळया ट्रस्टमधून करण्यात येत आहे.  आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही गरजवंत उपचारापासून वंचित राहणार नाही. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी  स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)