एकवेळ 50 वर्षांची शिक्षा द्या, पण मला जिवंत ठेवा : फिरोज खान

मुंबई : 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषींच्या शिक्षेसंदर्भात आजपासून युक्तीवादाला सुरुवात झाली आहे. या युक्तीवादादरम्यान स्फोटातील दोषी फिरोज खान न्यायालयाकडे दयेची भीक मागत होता.
मला फाशी देऊ नका. मला जन्मठेप द्या. मला 25 वर्षे किंवा 50 वर्षे, जेवढे वाटेल तेवढी वर्षे शिक्षा द्या. पण फाशी नको. फर्लो पॅरोलही देऊ नका. मी जेलमध्ये आयुष्य घालवेन. मी जिवंत आहे, हे फक्त माझ्या दोन मुलांना माहित असायला हवे., अशी विनवणी दोषी फिरोज खान यांनी न्यायालयाकडे केली. यावेळी खान याने, माझ्या कुटुंबातील मी एकटाच कमवता होतो. मला दोन मुले आहेत. पत्नी दुबईत मेहंदी लावण्याचे काम करते. माझे वडील वायूदलातून निवृत्त झाले आहेत. वडिलांची बायपास होणार असून, त्यासाठी पैसे नाहीत. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. असेही न्यायालयात सांगितले. मी केलेल्या गुन्ह्यांचा मला पश्‍चाताप आहे. दुबईतील मिटिंगमध्ये मी उपस्थित होतो. मात्र, शस्त्रांच्या ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला जायचे सांगितल्यावर मी नकार दिला होता. अशी कबुली फिरोज खान याने दिली. न्यायलायाने 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्याआधीपर्यंत फिरोज स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत होता. मात्र, शिक्षेची वेळ आली, त्यावेळी मात्र गुन्ह्यांची कबुली देऊ लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)