एकदा दिलेली माहिती पुन्हा देऊ नका?

केंद्रीय सतर्कता आयोगाचे आदेश


वारंवार तीच माहिती मागून प्रशासकीय कामकाजात अडथळा

पुणे – माहिती अधिकार कायद्यांतर्गत एकदा मागितलेली माहिती पुन्हा पुन्हा मागता येणार नाही. तसेच तीच तीच माहिती दोन पेक्षा अधिक वेळा मागितल्यास असे अर्ज रद्दबातल करणे तसेच माहिती नाकारण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्याला राहील असे आदेश केंद्रीय सतर्कता आयोगाने सर्व शासकीय अस्थापनांना दिले आहेत. वारंवार तीच माहिती मागून माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून प्रशासकीय कामकाजात अडथळे आणले जात असल्याचे सांगत माहिती देण्याच्या प्रक्रियेत काही बदल केला असल्याचे कळवित हे परिपत्रक काढले आहे.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत नागरिक, माहिती अधिकार कार्यकर्ते, तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींकडून माहिती अधिकारांतर्गत येणाऱ्या शासकीय कार्यालयांकडे माहिती मागविली जाते. मात्र, अनेकदा माहिती मागणाऱ्यांकडून एकदा दिलेली माहिती पुन्हा पुन्हा मागितली जाते. तसेच ती न दिल्यास संबंधित अधिकाऱ्याकडे अपील केले जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांकडूनही वारंवार या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली जाते. त्यातच दिल्ली येथे एका माहिती अधिकाराच्या प्रकरणात एकच माहिती वारंवार देता येणार नाही. तसेच नागरिकांनाही ती मागता येणार नाही. असा निकाल देण्यात आलेला आहे. त्याचा आधार घेत केंद्रीय सतर्कता आयोगाने माहिती देण्याच्या प्रक्रियेत काही बदल केले असून या बदलांची माहिती शासकीय संस्थांना पाठविण्यात आली आहे.

काही प्रमुख तरतूदींचा समावेश
केंद्रीय सतर्कता आयोगाने पाठविलेल्या पत्रात, वारंवार मागण्यात येणाऱ्या माहितीबाबत पुढील चार प्रमुख निर्देश देण्यात आले आहेत. त्यात एकच माहिती दोनपेक्षा अधिक वेळेस मागितल्यास ती देता येणार नाही, एकदा माहिती मिळाल्यानंतर नागरिकाला ती मागण्याचा अधिकार राहणार नाही. दिलेल्या माहितीसाठी पुन्हा अर्ज आल्यास तो निकाली काढण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यास राहील तसेच ती माहिती देण्यास संबंधित अधिकाऱ्याने नकार दिल्यास त्या निर्णयाविरोधात अपिलात जाता येणार नाही, अशा प्रमुख तरतूदींचा समावेश आहे.

केंद्रीय सतर्कता आयोगाला असे आदेश देण्याचे अधिकारच नाहीत. अधिकार फक्‍त केंद्र शासन, राज्य शासन व माहिती आयुक्तांना आहेत. त्यातच कायद्यातच बदल करायचा असल्यास संसदेतच बदल करावा लागणार आहे. त्यामुळे या पत्राचा माहिती अधिकाराशी काडीमात्र संबंध नाही. त्यामुळे या पत्राला काहीच अर्थ नाही.

– विवेक वेलणकर, माहिती अधिकार कार्यकर्ते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)