एकत्रित निवडणुका आत्ता शक्‍य नाही…

भाजपच्या योजनेला निवडणूक आयोगाचा खो
नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने एकत्रित निवडणुकांच्या नावाखाली देशातील काही राज्यांच्या निवडणुका पुढे ढकलून 11 राज्यांमध्ये लोकसभेबरोबरच एकत्रित निवडणुका घेण्याचा प्रस्ताव दिला असला तरी निवडणूक आयोगाने मात्र तो अमान्य केला आहे. सध्या एकत्रित निवडणुका घेणे शक्‍य नाही असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी कायदेशीर तरतूदींची गरज आहे असे मुख्य निवडणूक आयुक्त ओपी रावत यांनी म्हटले आहे. येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

अकरा राज्यांची निवडणूक लोकसभेबरोबर एकत्र घेण्याचा प्रस्ताव भाजपने कालच दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की त्यासाठी काहीं राज्यांच्या विधानसभा मुदती आधीच भंग कराव्या लागतील तर काही राज्यांच्या विधानसभांना मुदतवाढ द्यावी लागेल. त्यासाठी घटनादुरूस्ती करावी लागेल. त्यामुळे लोकसभेबरोबर 11 राज्यांच्या निवडणूका घेण्याचा प्रस्ताव मान्य करता येण्यासारखा नाहीआणि त्यासाठीची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची यंत्रणाही सज्ज नाही. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

-Ads-

छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश या तीन राज्यांत डिसेंबर पर्यंत निवडणूक घेणे अनिवार्य आहे. तथापि तेथे भाजपला निवडणूक जिंकणे अवघड असल्याने तेथील निवडणूक सहा महिन्यासाठी टाळून त्या लोकसभेबरोबर घेण्याचा भाजपचा डाव आहे अशी टीका कॉंग्रेसच्या गोटातून आत्तापासूनच सुरू झाली आहे. मात्र वन नेशन वन इलेक्‍शन ही संकल्पना प्राथमिक टप्प्यात राबवण्याच्या उद्देशानेच भाजपकडून हा प्रस्ताव देण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी विधी आयोगाला वन नेशन वन इलेक्‍शनचा प्रस्ताव सादर करणारे पत्र कालच लिहीले होते. तथापी भाजपच्या या संकल्पनेला अनेक विरोधी पक्षांचा विरोध आहे. एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावामुळे राज्यांचे वेगळेपण नाहीसे होईल आणि भारतीय संघराज्यपद्धतही त्यामुळे धोक्‍यात येईल असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)