एकच व्यापक धर्म असावा अशी स्वा.विवेकानंदांची धारणा

पुसेगाव ः डॉ. सुरेंद्रकुमार काटकर यांचा सत्कार करताना सुंदरगिरी महाराज, डॉ. सुरेश जाधव, केशव महाराज, मोहनराव जाधव, सुनिलशेठ जाधव, शंकरराव काटकर, आदिती काटकर आदी. (छाया ः प्रकाश राजेघाटगे)

पुसेगाव दि .( प्रतिनिधी ) जगात एक असा व्यापक धर्म असला पाहिजे की त्याने अस्तित्वात असलेल्या सर्व धर्मांना सामावून घेतले पाहिजे अशी स्वामी विवेकानंदांची धारणा होती असे प्रतिपादन स्वामीविवेकानंदाच्या विचारांचे अभ्यासक डॉ. सुरेंद्रकुमार काटकर यांनी केले.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित श्री सेवागिरी व्याख्यानमालेचा समारोप डॉ. काटकर यांच्या व्याख्यानाने झाला. स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील भाषणाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त “स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य” या विषयावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी पुणे येथील रामकृष्ण मठाचे केशव महाराज, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव,विश्वस्त मोहनराव जाधव, माजी अध्यक्ष सुनिलशेठ जाधव, शंकरराव काटकर, सौ. आदिती काटकर उपस्थित होते.
डॉ. काटकर पुढे म्हणाले, विवेकानंदांच्या सानिध्यात आलेली व्यक्ती त्यांना कधीही विसरु शकत नव्हती एवढे स्वामीजींचे व्यक्तीमत्व प्रभावी होते. त्यांच्या प्रभावी विचारांमुळेच अनेक लोकांच्या व्यक्तीमत्वात सकारात्माक परिणाम झाला आहे. एकेकाळी सधन असलेल्या भारत देशाची अधोगती का झाली यांचे कन्याकुमारी येथे गेल्यावर त्यांनी चिंतन केले. या देशाचे दुःख व दैन्य या देशात राहून संपविणे शक्‍य नाही असा विचार करुन त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला व त्याच वेळी अमेरिकेत सर्वधर्म परिषद होणार असल्याचे समजल्यावर ते अमेरिकेला गेले. तेथील भाषणात माझ्या बंधू , भगिनी या त्यांच्या शब्दातून बंधूत्वाची भावना संक्रमीत झाली व तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला ते आपल्या भावासारखे वाटले. या परिषदेत त्यांनी हिंदू धर्माची व त्याच्या सहिष्णूतेची महती जगाला पटवून दिली. सर्व धर्म सत्य आहेत व आवश्‍यक आहेत. अन्य धर्मांचा तिरस्कार न करता प्रत्येकाने शुध्द भावनेने आपल्या धर्मांप्रमाणे आचरण केले तर तो मनुष्य उच्चपदाला पोहचू शकतो असा विचार त्यांनी सांगितला. बहुजन समाजाची व महिलांची उपेक्षा व त्यांच्यावरील अन्याय ही आपल्या देशाची पापे आहेत व त्यामुळेच आपला देश गुलामगिरीत अडकून दैन्यास्थेला पोहोचला असे स्वामीजींना वाटे. एक चांगला माणूस व चांगला नागरिक बनण्यासाठी तसेच आपापल्या क्षेत्रातील आदर्श व कार्यक्षम व्यक्ती बनण्यासाठी स्वामीजींचे विचार सदैव प्रेरक व मार्गदर्शक ठरतात यावरुनच त्यांचे अष्टपैलूत्व सिध्द होत असल्याचे डॉ. काटकर यांनी नमुद केले. मोहन गुरव यांनी सुत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)