ऍस्ट्रोसिटी निर्णयाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार

रामदास आठवले : कॉंग्रेसने राजकारण करू नये
मुंबई – ऍट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा या कायद्याचा अवमान करणारा आहे. या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री खासदार रामदास आठवले यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरून कॉंग्रेसने राजकारण करू नये. कॉंग्रेसला जर दलितांची इतकीच काळजी असेल तर संसदेत चर्चा करावी असे आवाहनही आठवले यांनी केले.

सहयाद्री या शासकीय अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. देशात दरवर्षी ऍट्रॉसिटीचे 46 हजार गुन्हे दाखल होतात. त्यातील काही अपवाद वगळता 99 टक्‍के गुन्हे हे सत्यच असतात, असे रामदास आठवले म्हणाले. ऍट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हे जजमेंट’ नसून ते न्यायालयाचे मत आहे.

मात्र, हे मत गाईडलाईन म्हणून पुढील प्रकरणांत दूरगामी परिणाम करणारे ठरेल. म्हणूनच त्याविरोधात रिपाइं आठवले गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हेगाराला जामीन मिळत नाही. कॉंग्रेसच्या कार्यकाळात याची कधीच अंमलबजावणी झाली नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात केंद्र सरकारने ऍट्रॉसिटी कायदा अधिक कठोर केला असल्याचेही ते म्हणाले.

ऍट्रॉसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची विनंती आपण भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रिय अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेऊन केली आहे. केंद्रिय विधि व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद हे न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून पुनर्विचार याचिका दाखल करतील, असे आश्वासन अमित शहा यांनी दिल्याचेही आठवले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)