ऍशेस विजयाच्या तोडीची कामगिरी – ट्रेव्हर बेलिस 

आगामी मालिकांसाठी संघबांधणी करण्याचा इंग्लंडचा प्रयत्न 
साऊदम्पटन – चौथा कसोटी सामना चौथ्याच दिवशी जिंकून भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली. या कामगिरीबद्दल इंग्लंडच्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंग्लंडच्या संघाचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी तर या विजयाची तुलना ऍशेस मालिका विजयाबरोबर केली आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा 60 धावांनी पराभव केल्यानंतर बेलिस म्हणाले की, भारताचा संघ हा जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा आहे. या संघाला पराभूत करणे सोपे नाही आणि आम्ही ही कामगिरी या कसोटी मालिकेत केली आहे. त्यामुळे हा विजय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या ऍशेस मालिकेच्या तोडीचाच आहे.

बेलिस पुढे म्हणाले की, सामन्याच्या पहिल्या दिवशी आमचा संघ लवकर दडपणाखाली आला होता. मात्र काही खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखून संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. हे संघाच्या प्रगतीचे एक लक्षण मानावे लागेल. कारण संघातील प्रत्येक खेळाडू संघातील आपले स्थान आणि जबाबदारी ओळखून कामगिरी करतो आहे, हे संघाच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

त्याच बरोबर इंग्लंडचा सलामीवीर ऍलिस्टर कूकने अचानक आपली निवृत्ती जाहीर केली असून कर्णधार जो रूट देखील चालू मालिकेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी सुरू होत असलेल्या भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात, तसेच श्रीलंका आणि वेस्ट इंडीज संघाविरुद्धच्या आगामी मालिकेपूर्वी फलंदाजीच्या क्रमवारीत प्रयोग करण्याची अखेरची संधी म्हणून पाचव्या सामन्याकडे पाहात असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

आगामी मालिकांच्या दृष्टीने प्रयोग करताना चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात मोईन अलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवून तो या क्रमांकावर फलंदाजीचा पर्याय असू शकतो का याची चाचपणी केल्याचेही बेलिस यांनी यावेळी सांगितले. तसेच आगामी मालिकांच्या दृष्टीने फलंदाजांच्या क्रमवारीत थोडाफार बदल होत राहणार आहे. मात्र हा बदल केवळ एक किंवा दोन फलंदाजांच्या बाबतीतच होणार आहे. तसेच गेल्या काही मालिकांमध्ये आम्ही मोईन अलीच्या बाबतीत अनेक प्रयोग केले असून तो यासाठी एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोईन अली आपल्या खेळात सातत्याने सुधारणा करताना दिसत आहे. मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी. मात्र त्यामुळे मोईन अली सातत्याने किंवा कायमस्वरूपी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येईलच असे नाही, असे सांगून बेलिस म्हणाले की, रूट हाच पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्याचीही शक्‍यता आहे. परंतु हे सारे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून राहील. सध्या तरी मोईन अलीच्या रूपाने आम्हाल एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे यात शंका नाही.

जो रूट नेहमीच चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास उत्सुक असतो, असे सांगून बेलिस म्हणाले की, जरी तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 50च्या सरासरीने धावा करत असला, तरी तो संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणे अधिक आवश्‍यक असल्याचे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणाऱ्या चांगल्या फलंदाजाच्या शोधात आहोत, जेणेकरून रूट आपल्या अपेक्षित चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)