ऍनिमेशन डे : अस्सल, आशयसंपन्न कलात्मक ऍनिमेशन 

राजेश खेले 
वर्ष 1892 मध्ये 28 ऑक्‍टोबर याच दिवशी पॅरीसमध्ये ग्रेव्हीन म्युझियममध्ये चार्ल्स इमाईल रेनॉड्‌स यांच्या जगातल्या ऐतिहासिक पहिल्या ऍनिमेशनपटाचे प्रदर्शन झाले होते. “द असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल फिल्म्स द ऍनिमेशन’ म्हणजेच असिफा’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने हा दिन आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिन’ म्हणून 50 पेक्षा जास्त देशात 1000 पेक्षा जास्त इव्हेंट्‌समधून साजरा केला जातो. अनेक कार्यशाळा, सेमिनार्स, केसस्टडीज्‌, ऍनिमेशनपट प्रदर्शन, मासिक कम्प्युटर ग्राफिक मिटींग्ज, कम्युनिटी ऍक्‍टीव्हीटीज्‌, भारतीय ऍनिमेटर्सकरिता शैक्षणिक कार्यक्रम, चित्रपट महोत्सवासारखे कार्यक्रम या अंतर्गत आयोजित केले जातात. 
अफाट कल्पनारम्यता, निखळ मनोरंजन मूल्य आणि अद्‌भुत अशा आभासी विश्‍वात घेऊन जाण्याची अचाट क्षमता असलेल्या कलात्मक ऍनिमेशन क्षेत्राकडे प्रेक्षक कायमच आकर्षित होत गेलाय. अनेक सृजनशील दृश्‍य कलावंतांना हे ऍनिमेशन क्षेत्र काहीतरी नवीन करू पाहण्याच आव्हान देत असतं. बहुतांशी वेळेस मोठ्या पडद्यावर ऍनिमेशनपट साकारण्याच आव्हान लीलया पेललं जातं. ऍनिमेशनपटांशिवाय व्हिडीओ गेम्स हे प्रेक्षकांचं आवडत मनोरंजन माध्यम लोकप्रिय आहेच. चित्रपट काय किंवा कार्टून मालिका काय, व्हिडीओ गेम्स किंवा व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स अथवा अगदी जाहिरातपट काय सर्वच ठिकाणी ऍनिमेशन तंत्रज्ञानाचा उपयोग होतोच.
या सर्व ऍनिमेशन माध्यमांच्या कलानिर्मितीमागील सृजनशीलता समजावून घेणे महत्त्वाचे ठरेल. भारतात ऍनिमेशन क्षेत्राने जरी भरारी घेतली असली तरीदेखील अस्सल आशय प्रधान ऍनिमेशनपट अजून म्हणावे तितके तयार होतांना दिसत नाहीत. भारतातील बऱ्याच ऍनिमेशन निर्मिती संस्था आणि कलातंत्रज्ञ हे परदेशी निर्मात्यांकरिता आणि परदेशी साहित्यावर आधारित कथांवर काम करतात. अर्थात, त्यामुळे रोजगारनिर्मिती झाली जरी असली तरी आपल्या मातीतील साहित्यावर आधारित ऍनिमेशन निर्मितीस म्हणावी तशी चालना मिळत नाही. आजच्या जागतिकीकरणाच्या लाटेवर भारतीय ऍनिमेशनला स्वार होण्यास अजून बराच मोठा पल्ला गाठता येऊ शकतो. नाही म्हणायला 90 च्या दशकात जपान आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमाने “ऍनिमेटेड रामायण’ या चित्रपटाची निर्मिती जगभरात 14 भाषांमध्ये झाली. परंतु हे उदाहरण सोडल्यास आपले अस्सल साहित्य अजून जगासमोर ऍनिमेशन माध्यमातून यायला हवे.
या ऍनिमेशनची कोणत्याही शैलीतील मूलभूत निर्मिती प्रक्रिया ही चित्रकलेशिवाय पूर्ण होत नाही. ऍनिमेशनचे कुठल्याही शैलीतील काम हे प्रि-प्रॉडक्‍शन, प्रॉडक्‍शन आणि पोस्ट प्रॉडक्‍शन अशा टप्प्याने होते. यात प्रॉडक्‍शन आणि पोस्ट प्रॉडक्‍शन हे जवळ जवळ 90% वेळा कम्प्युटर सॉफ्टवेअरचा वापर करून केले जाते. परंतु प्रि-प्रॉडक्‍शन जरी कम्प्युटरवर होत असले, तरीही लेखकाची कल्पनारम्यता ही चित्रकाराला दृष्य माध्यमातून मांडवी लागते. दृष्य माध्यमात ती मांडतांना चित्रकाराकडे मात्र शोधक नजर, नवकल्पना चित्रबद्ध करण्याची हातोटी, वास्तववादी माणसे, प्राणी, वस्तू, त्यांचे हावभाव, देहबोली, कथाकथन सांगणारी चित्रे काढण्याचे कौशल्य असावे लागते. हे अस्सल कौशल्य तुलनेने कमी प्रमाणात भारतीय चित्रकारांमध्ये पाहायला मिळते. प्रत्यक्षात आज भारतातील अनेक ऍनिमेशन स्टुडिओ याच प्रि-प्रॉडक्‍शन (कन्सेप्ट आर्ट) करणाऱ्या उत्तम चित्रकारांच्या शोधात असतात किंवा आहेत.
आपल्याकडील बरेच चित्रकार हे पोर्ट्रेटस्‌, लॅन्डस्केप्स, कंपोझीशन्स उत्तम करतात; परंतु त्याशिवाय ऍनिमेशनमधून चैतन्य निर्माण करणारी, भौतिक आणि जीवशास्त्राची आणि साहित्याची उत्तम जाण असणारी, सिनेमा तंत्राचा अभ्यास असलेली चित्रकार मंडळी तसेच लेखक/कवी नक्की काय म्हणू पाहतोय, याचाही शोध घेणारी दृष्यकलाकारांची वाढ होणे अपेक्षित आहे. या दृष्टीने ऍनिमेशन शिकवणाऱ्या संस्थांनी विशेष आणि खास पुढाकार घेण्याची गरज आहे.
उत्तम यशस्वी ऍनिमेशन फिल्म्स किंवा गेम्सचा पाया हा अस्सल प्रि-प्रॉडक्‍शन डिझाईन हीच असते, हे लक्षात घेणे गरजेचे असते. जगातल्या सर्वोत्तम कालातीत फिल्म्स आठवून बघा. सर्वात प्रथम आपला सर्वांचा लाडका मिकी माऊस, त्याची रचना, त्याचे हावभाव, देहबोली, विशिष्ट आवाज, त्यांचे 360 अंशातले वेगवेगळे स्केचेस आजही आजच्या पिढीस आकर्षित करतो आहे. डोनाल्ड डक, टॉम ऍन्ड जेरी, आताचे “कार्स’ चित्रपटातील पात्रे, फ्रोजन’ ची पात्रे, “अँग्री बर्डस्‌’, “पोकेमॉन, आपला “छोटा भीम’, वर्ष 2005 मध्ये आलेला “हनुमान’ अशी अनेक यशस्वी पात्रे म्हणजेच उत्तम प्रि-प्रॉडक्‍शन डिझाईनच.
अनेक दशकानंतरही त्याची त्या-त्या निर्मात्यास/कलाकारास रॉयल्टी मिळते, हे विशेष. ही पात्रं म्हणजे सेलेब्रिटीच. या ऍनिमेटेड फिल्म्सचे चाहते मात्र जगभर असतात. त्यांना भाषा, जात, धर्म किंवा भौगोलिक सीमेच बंधन नाही आणि हीच खरी संधी खऱ्या चित्रकारास खुणावत असते.
(लेखक ऍनिमेशन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत)
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)