ऍनिमेशनपटांतही भारतीय संस्कृतीची पताका 

जे काम मिकी माऊस इंग्रजीसाठी करतो तेच काम छोटा भीम आणि मोटू-पतलू हिंदीसाठी (किंवा अन्य भारतीय भाषांसाठी) करू शकतात. तेनाली रामन, अकबर-बिरबल आणि शेखचिल्ली अशी अनेक पात्रे आपल्या अवतीभोवती दबा धरून बसली आहेत. योजकस्तत्र दुर्लभः या न्यायाने त्यांना साकार करणाऱ्या व्यक्‍त फक्‍त हव्या आहेत. तेव्हा भारतीय संस्कृतीची पताका अशीच पात्रे पुढे नेणार आहेत.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंसिल ऑफ इंडिया (बीएआरसी) या संस्थेच्या एका अहवालानुसार, बालमनोरंजन क्षेत्रात “निक’ आणि “पोगो’ या वाहिन्यांनी लोकप्रियतेत बाजी मारल्याचे दिसून आले होते. त्यांनी “डिस्ने’ व “कार्टून नेटवर्क’ अशा नामांकित वाहिन्यांना मागे टाकले होते. “मोटू पतलू’ आणि “छोटा भीम’ या शुद्ध देशी अवतारातील, आपल्या भाषेतील पात्रांनी बच्चे कंपनींना भुरळ घातली आणि व्यावसायिक यशाचा पाया रचला. मग “माईटी राजू’, “कृष्णा’ आणि “लव-कुश’ असे अनेक भारतीय कार्टून छोट्या पडद्यावर अवतरले आहेत. खुद्द “डिस्ने’ वाहिनीवरही “अर्जुन : द वॉरियर प्रिन्स’ची लोकप्रियता मोठी आहे.

कार्टून पात्रं हा लहान मुलांच्या भावविश्‍वाचा भाग असतो. “मिकी’पासून “स्पायडरमॅन’पर्यंत आणि “लॉयन किंग’पासून “सुपरमॅन’पर्यंत या पात्रांनी कित्येक पिढ्या बालमनावर अधिराज्य गाजवले आहे. आपल्याकडे “अमर चित्र कथा’मधील रामायण, महाभारत व अन्य कथांनी मुलांवर संस्कार करण्याचे काम केले. कार्टूनिस्ट प्राण यांच्या “चाचा चौधरी’, “बिल्लू आणि पिंकी’ने किती जणांचे रंजन केले याला गणती नाही. आज त्यांची जागा हलत्या चित्रांचे राज्य असलेल्या टीव्हीने घेतले आहे. “शक्तिमान’ हा भारतातील पहिला सुपर हिरो मानला जातो, तर “जंगल बुक’चे “चड्डी पहन के फूल खिला है,’ हे गाणे आजही लोक विसरु शकत नाहीत.

लहान मुले हा दूरचित्रवाणी प्रेक्षकांमधील तिसरा सर्वात मोठा वर्ग आहे. सामान्य मनोरंजन वाहिन्या पाहणारे 58 टक्के, चित्रपट वाहिन्या पाहणारे 20 टक्के आणि लहान मुलांचा 5.6 टक्के असा प्रेक्षकवर्ग आहे, असे फिक्की-केपीएमजी या संस्थांच्या अहवालात म्हटले आहे. मात्र मनोरंजनाच्या पलीकडेही या खट्याळ मंडळींचा स्वतःचा असा एक उपयोग आहे. कुठल्याही भाषेचा आणि संस्कृतीचा प्रसार करण्याचे काम ही मंडळी करतात. जे कार्य एकेकाळी “पंचतंत्र’ने भारतीय संस्कृतीसाठी आणि “अरेबियन नाईट्‌स’नी अरबस्तानातील संस्कृतीसाठी केले, तेच काम ही पात्रे त्या-त्या देशातील संस्कृतीसाठी करत आहेत. “डोरेमॉन’मधून जपानी संस्कृती आणि “शिनचान’मधून चिनी संस्कृतीचे संस्कार मुलांवर घडतात. “मिकी माऊस’ तर अमेरिकी संस्कृतीचा राजदूतच ठरतो.

अमेरिकेत वॉल्ट डिस्ने यांनी 1928 मध्ये “मिकी माऊस’ला जन्म दिला आणि विल्यम हना व जोसेफ बर्बरा यांनी सन 1940 मध्ये “टॉम अँड जेरी’ची निर्मिती केली. जपानमध्ये सन 1969 मध्ये “डोरेमॉन’ आला आणि सन 1973 मध्ये तो टीव्ही मालिकेत दिसला. भारतात पहिली “ऍनिमेटेड टीव्ही मालिका “गायब आया’ ही सन 1986 मध्ये दूरदर्शनवर आली होती. “छोटा भीम’ पहिल्यांदा सन 2008 मध्ये प्रथमच “पोगो टीव्ही’वर आला. आजही ही मालिका लोकप्रिय आहे. “छोटा भीम’च्या नावाने विविध वस्तूंनी बाजारपेठ (मर्कंडाईज) सजली आहे. वरकरणी गंमतीचा खेळ वाटणाऱ्या या कार्टून्सची सांस्कृतिक दहशत एवढी आहे की, प्रत्यक्ष दहशतवादी धोरण राबविणाऱ्या देशालाही त्याची धडकी भरते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या वर्षी एक विशेष पत्रकार परिषद घेतली होती. तिचा विषय होता “बाहुबली-2!’ हा चित्रपट चांगला आहे, परंतु 1992 सालच्या विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीएवढा चांगला नाही, असे त्यांनी म्हटले होते. वर “कट्टप्पाने बाहुबलीला का मारले ही उत्सुकता मलाही होती’, अशी मखलाशीही केली होती. याचे कारण भारतीय साहित्यावर आधारलेल्या, भारतीय भाषांत असलेल्या ऍनिमेटेड मालिकांनी पाकिस्तानी बालकांच्या मनांवर अधिराज्य गाजवायला सुरूवात केली आहे.

पाकिस्तान इलेक्‍ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऍथॉरिटीने (पेमरा) हिंदी भाषेत डब केलेल्या प्रसिद्ध जपानी ऍनिमेटेड सीरिज “डोरेमॉन’वर बंदी घालावी. कारण त्यामुळे मुलांवर वाईट परिणाम होत आहे. ते हिंदी भाषा शिकत आहेत आणि हे कार्टून उर्दूतून सादर करावेत, असे त्या ठरावात म्हटले होते. त्यानंतरही याच पक्षाचे विधानसभा सदस्य डॉ. मुराद रास यांनी पुन्हा असाच एक ठराव आणला. त्यात “डोरेमॉन’मुळे मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार, त्यांनी केली होती.
कार्टून पात्रांचा हा करिष्मा ओळखूनच आता फ्रान्स सरकारने भाषा शिक्षणासाठी त्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील प्राथमिक शाळेतील मुलांना आता इंग्रजीतील व्यंगचित्रे पाहण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कारण परदेशी भाषा शिकविण्याची कार्टूनची क्षमता तेथील सरकारने ओळखली आहे.

फ्रेंच मुलांच्या कमकुवत इंग्रजी कौशल्याला उठाव देण्यासाठी हा एक प्रयत्न करण्यात येत आहे. आम्हाला उत्तम प्रकारे माहित आहे की, आमच्या शेजारील स्कॅन्डिनेव्हियन देशांतील लोक इंग्रजीत उत्तमरीत्या पारंगत आहेत याचे कारण ते मूळ भाषांतील चित्रपट पाहतात, असे फ्रान्सचे शिक्षणमंत्री जीन मिशेल ब्लॅंकर यांनी नुकतेच सांगितले. अर्थात मिकी माऊसला इंग्रजी शिकविण्यासाठी जुंपण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. स्वतः वॉल्ट डिस्ने कंपनीने “मिकी’ आणि “डोनाल्ड डक’ यांना या कामाला जुंपले होते आणि तेही चीनमध्ये! तेथे दरवर्षी 150,000 मुलांना इंग्रजी शिकविण्याचे लक्ष्य डिस्ने कंपनीने ठेवले होते. हा कार्यक्रम 2015 पर्यंत सुरू होता. इंग्रजी शिकण्यामध्ये चीन ही सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी खासगी बाजारपेठ आहे. त्याचे बाजारमूल्य वार्षिक 2.9 अब्ज डॉलर्स आहे. चीनमधील त्या प्रयोगात एक ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अभ्यासक्रम राबविण्यात आला. त्यासाठी वार्षिक 2,200 डॉलर एवढी शिकविणी फी होती आणि ते देणाऱ्यांची तयारी असणारे पालकही मोठ्या संख्येने होते. त्यामुळे भारतीय अवतारातील कार्टून कॅरेक्‍टर्सही आता लोकशिक्षणाचे काम करतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)