अलिगड – अनुसुचित जाती/ जमाती कायद्यात अलिकडेच करण्यात आलेल्या दुरुस्त्यांसाठी पंतप्रधान मतपेढीचे राजकारण करत आहेत, अशी टीका अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. या आशयाचे रक्‍ताने लिहीलेले पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे.

अनुसुचित जाती/ जमाती कायद्यातील हे बदल मागे न घेतले गेल्यास आपल्याला आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकून पांडे यांनी या पत्राद्वारे केली आहे. या पत्रावर पांडे यांच्यासह महासभेच्या अन्य 14 सदस्यांनी रक्‍ताने स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

संसदेने अलिकडेच ऍट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यामध्ये दुरुस्ती करणारा कायदा मंजूर केला. आरोप असलेल्या व्यक्‍तीस तात्काळ अटकेची या कायद्यातील तरतूद सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली होती. हा बदल हटवणारे दुरुस्ती विधेयक संसदेने मंजूर केले होते.

शरियत न्यायालयाच्या धर्तीवर हिंदू महासभेने हिंदू न्यायालयाची स्थापना करून पांडे यांना न्यायाधीश म्हणून नियुक्‍त केले होते. ऍट्रॉसिटी कायद्यातील ताज्या दुरुस्त्यांमुळे या कायद्याचा गैरवापर केला जाईल, अशी भीती सवर्ण समाजाता वाटते आहे. ऍट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्त्यांमुळे हिंदू समाजातील जातींचे भेद अधिकच वाढतील, असा दावाही पांडे यांनी केला आहे. ऍट्रॉसिटी कायद्यातील या दुरुस्त्यांच्या विरोधात सवर्ण समाजातील संघटनांनी 10 सप्टेंबर रोजी “भारत बंद’ पुकारला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)