ऊस वाहतूक बैलगाडीला टॅंकरची धडक

पुणे-सोलापूर महामार्गावर तीन जण ठार; एक जण गंभीर जखमी

यवत- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुलाजवळील बोरीपारधी गावच्या हद्दीत भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला केमिकल वाहतूक करणाऱ्या टॅंकरची धडक बसून झालेल्या भीषण अपघात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात पती, पत्नी व त्यांच्या सात महिन्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. तर, वडील गंभीर जखमी झाले आहेत. शनिवार (दि.10) सकाळी पहाटे 5:30च्या सुमारास झाला.
यवत पोलिसांनी सांगितले की, या अपघातात गोरख वेडू चव्हाण (वय 25), जयश्री गोरख चव्हाण (वय 22) व पपी गोरख चव्हाण (वय 7 महीने, सर्व रा. भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस, ता. दौंड/ मूळ रा. तळबंद तांडा, अमदरे, ता. भडगाव, जि. जळगाव) या तिघा पती, पत्नी व मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. वेडू गणपत चव्हाण (वय 58) यांच्या डोक्‍याला, छातीला, पायाला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दौंड येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आज (शनिवार) हे ऊसतोड कामगार पहाटे लवकर पाटस कारखाना येथून ऊसतोडीसाठी 10 बैलगाडीसह 20 जण आपल्या मुला बाळांसह सोलापूर-पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्याने चौफुलाच्या दिशेने निघाले होते. हा बैलगाड्यांचा तांडा पहाटे 5:30च्या सुमारास बोरीपारधी गावच्या हद्दीत पोहचला. हॉटेल लक्ष्मीनारायण जवळील महामार्ग ओलांडून या बैलगाड्यांच्या तांड्याला जायचे होते. सर्वात पुढे गोरख चव्हाण यांची बैलगाडी होती. महामार्गावर पुणे बाजूकडून येणाऱ्या गाड्यांना हातवर करून हा बैलगाड्यांचा तांडा महामार्ग ओलांडीत होता. यावेळी सर्वात पुढे असलेल्या गोरख चव्हाण यांच्या बैलगाडीला पुणे बाजूकडून येणाऱ्या केमिकल वाहतूक करणाऱ्या टॅंकरने (क्र. एमएच 08 एच 0512) वेगात येऊन जोराची धडक दिली. या अपघातात बैलगाडीतील सर्वजण महामार्गावर फेकले गेले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. या अपघातात बैलगाडीचे दोन्ही बैलही जखमी झाले आहेत, त्यांच्यावरही पशुवैद्यकीय डॉक्‍टरांमार्फत उपचार करण्यात आले. या अपघाताची माहीती ऊसतोड मुकादम संजय गबरु पवार यांनी यवत पोलिसांना दिली. यवत पोलिसांनी टॅंकर चालक संजयकुमार उदीत मंडल (रा. परशुराम लोटे रोड, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर करीत आहेत.

  • ट्रॅक्‍टर व बैलगाड्यांना रिफ्लेक्‍टर लावणे गरजेचे…
    ट्रॅक्‍टर व बैलगाड्यांनी महामार्गावरून ऊस वाहतूक करताना परावर्तित रिफ्लेक्‍टर लावणे कायदेशीररित्या बंधनकारक असून यासाठी कारखाना व्यवस्थापनानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. अशाच प्रकारे यवत जवळ अनुराज साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांच्या तांड्याला ((दि.4) पिकअप जीपने धडक दिली होती. त्या अपघातात सुदैवाने मनुष्यहानी झाली नव्हती. परंतु, एका बैलाचा मृत्यु झाला होता. बैलगाड्यांना परावर्तित रिफ्लेक्‍टर असते तर आजचा अपघातही टळला असता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)